इन्कम टॅक्स विभागात नोकरीचे आमिष; सहा जणांची साडेपाच लाखांची फसवणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

इन्कम टॅक्स विभागात नोकरीचे आमिष; सहा जणांची साडेपाच लाखांची फसवणूक

 इन्कम टॅक्स विभागात नोकरीचे आमिष; सहा जणांची साडेपाच लाखांची फसवणूक

सोलापूर (कटूसत्य वृत्त) : इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून तसेच स्वतः त्या विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असल्याचे भासवून एका भामट्याने सहा जणांची तब्बल ५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत उशांत कपिल जाधव (रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदिप शिवाळ उर्फ संदिप शर्मा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपण इन्कम टॅक्स विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असल्याचे सांगून फिर्यादी उशांत जाधव व त्यांच्या ओळखीतील इतर पाच जणांचा विश्वास संपादन केला. तसेच त्याची पत्नी केंद्रीय विद्यालयात नोकरीला असून तेथेही रिक्त पदे असल्याचे सांगत संबंधितांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या आमिषाला बळी पडलेल्या सहा जणांकडून आरोपीने टप्प्याटप्प्याने एकूण ५ लाख २५ हजार रुपये उकळले. मात्र, दीर्घकाळ उलटूनही कोणालाही नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता आरोपीने सर्वांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०२५ पासून आजतागायत हा फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुतार करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages