देश आर्थिक संकटात असताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट कशासाठी?; संभाजी ब्रिगेडचा सरकारला सवाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सचिन जगताप यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत हा प्रकल्प शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप केला आहे.
जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देश आणि राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना सरकारने लोकांना काटकसरीचा सल्ला देण्याऐवजी तब्बल १ लाख २५ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया रात्री आणि पहाटेच्या वेळी सुरू केली आहे. हा प्रकल्प कोणाच्या हितासाठी राबवला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, या महामार्गाची राज्यातील जनतेकडून कोणतीही मोठी मागणी झालेली नाही. तसेच या प्रकल्पासाठी कोणतेही व्यापक लोकआंदोलन किंवा जनतेची आग्रही भूमिका दिसून येत नसताना सरकार हा प्रकल्प का रेटत आहे, याचे उत्तर नागरिकांना मिळाले पाहिजे. "लोकांच्या गरजा, रोजगार, शेती, पाणी आणि ग्रामीण विकास यांसारखे प्रश्न प्रलंबित असताना सरकारने एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प हाती घेणे योग्य आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला
शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतीजमीन संपादित केली जाणार असल्याने हजारो शेतकरी आणि शेतमजुरांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या कष्टाने उभी केलेली शेती आणि त्यावर आधारित उपजीविका धोक्यात येणार असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
"शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून विकासाचे स्वप्न दाखवले जात आहे. जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांचे पुनर्वसन, रोजगार आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता याबाबत कोणतीही स्पष्ट हमी सरकार देत नाही," अशी टीका त्यांनी केली.
पूर्वीच्या विकासदृष्टीची आठवण
यावेळी त्यांनी राज्यातील पूर्वीच्या नेतृत्वाच्या कृषी विकासाच्या धोरणांचा उल्लेख करत तुलना केली. "एकेकाळी राज्यातील नेतृत्वाने शेती आधुनिक व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी परदेशातून स्ट्रॉबेरीची रोपे विमानाने आणून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले प्रपंच आणि भांडवलच हिरावून घेण्याचे काम सुरू आहे," असे ते म्हणाले.
सरकारने भूमिका स्पष्ट करावी
शक्तीपीठ महामार्गामुळे नेमका कोणता आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक फायदा होणार आहे, याबाबत सरकारने जनतेसमोर सविस्तर माहिती ठेवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. प्रकल्पाच्या खर्चाचा भार, जमीन संपादनाची प्रक्रिया, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे संघटनेचे मत आहे.
संभाजी ब्रिगेडने या प्रकल्पाविरोधातील जनमत लक्षात घेऊन सरकारने पुनर्विचार करावा, अन्यथा शेतकरी आणि जनतेच्या हक्कांसाठी राज्यभर तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला आहे.
चौकट
"देश आर्थिक संकटात असताना लोकांनी काटकसर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; मात्र दुसरीकडे लाखो कोटींच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. हा विकास नेमका कुणासाठी?" — सचिन जगताप, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड


No comments:
Post a Comment