शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 4, 2026

शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा

 शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती सौ. रंजीता ताई चाकोते, नगरसेविका सौ. रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सौ. सारिका आक्कुलवार, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, सहायक नगररचना संचालक समीर सितोळे, नॅशनल हायवे विभागाचे सुनील फुलारी, एस. पी. काळे, महेश येमूल, उद्धव कांबळे, विजय काकडे, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, मनोज जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या जुना पुणा नाका ते कंबर तलाव तसेच मार्केट यार्ड ते कंबर तलाव या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या अनुषंगाने बाधित होणाऱ्या क्षेत्रांची माहिती संबंधित विभागांकडून सादर करण्यात आली.
उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संदर्भात विविध विभागांशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमुळे केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिका, खासगी मालमत्ता धारक, पोस्ट विभाग, बीएसएनएल, संरक्षण विभाग (डिफेन्स), पोलीस विभाग तसेच रेल्वे विभागाच्या काही जागा बाधित होणार असून त्या संपादन अथवा हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय संबंधित विभागांकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC), तांत्रिक मंजुरी, जमीन हस्तांतरण प्रक्रिया आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्या.
सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे उड्डाणपूल महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
महापौर विनायक कोंड्याल यांचे उद्गार
"सोलापूर शहराच्या दृष्टीने प्रस्तावित उड्डाणपूल हे अत्यंत महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत. या कामांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ व इंधनाची बचत होणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या केंद्र शासन, राज्य शासन, रेल्वे, पोलीस, पोस्ट, बीएसएनएल, डिफेन्स तसेच खासगी मालकीच्या जागांबाबत सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रक्रिया गतीमान करावी. सोलापूरच्या विकासासाठी हे प्रकल्प प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages