सोलापूर (कटूसत्य वृत्त) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा लोकसहभागातून उल्लेखनीय कायापालट झाला असून ही शाळा आता आधुनिक, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ज्ञानमंदिर बनली आहे. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे शाळेला नवे रूप प्राप्त झाले आहे.
शाळेत प्रवेश करताच आकर्षक रंगसंगती आणि सुशोभित प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते. शाळेच्या भिंतींवर प्रतापगड, भारतीय संविधान, भारत व महाराष्ट्राचे नकाशे, राष्ट्रीय प्रतीके, वन्यजीव, पक्षी, फुलपाखरे, समुद्री जीवसृष्टी, संगीत वाद्ये तसेच पर्यावरणविषयक विविध चित्रे रेखाटण्यात आली आहेत. थ्री-डी शैलीतील या चित्रांमुळे शाळेच्या भिंती ‘बोलक्या’ बनल्या असून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक रंजक आणि प्रभावी झाले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी वर्गखोल्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाला चालना मिळत आहे.
या परिवर्तनामागे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींचे मोलाचे योगदान आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी पुण्यातील एका कंपनीच्या सीएसआर निधीतून सुमारे साडेआठ लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. या निधीतून प्रत्येक वर्गखोलीत एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, संगणक, साऊंड सिस्टिम तसेच इतर आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.
स्थानिक उद्योजक किशोर माळी यांनी १ लाख ५१ हजार रुपयांची तर उद्योजक शिवानंद हत्तुरे यांनी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. याशिवाय ग्रामस्थ, पालक आणि विविध दात्यांनीही शाळेच्या विकासासाठी उदार योगदान दिले.
लोकसहभाग, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा संगम साधणारी इंगळगीची जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून शैक्षणिक क्षेत्रात आदर्श निर्माण करत आहे.
No comments:
Post a Comment