वादळी वाऱ्यासह पावसाने केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

वादळी वाऱ्यासह पावसाने केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान

वादळी वाऱ्यासह पावसाने केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान

आ. अभिजित पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर; तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना


पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : गेल्या दोन दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघांतर्गत पंढरपूर, माढा आणि माळशिरस तालुक्यातील विविध भागांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केले आहे. या अस्मानी संकटामुळे काढणीस आलेल्या केळी, डाळिंब, आंबा तसेच इतर नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अभिजित पाटील यांनी आज सकाळपासूनच नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह अधूनमधून पाऊस सुरू आहे. वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी, गारअकोले, आलेगाव बुद्रुक आदी गावांमध्ये वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. डाळिंब, आंबा व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, जनावरांचे शेड आणि शेती साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

आ. अभिजित पाटील यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त शेतजमिनी व फळबागांची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत हतबलता व्यक्त केली. त्यावर आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत, "नुकसान मोठे असले तरी खचून जाऊ नका. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत आणि भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे व संबंधित मंत्र्यांकडे आपण स्वतः पाठपुरावा करणार आहोत," अशी ग्वाही दिली.

तसेच प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे, ऊस दर नियंत्रण समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पाटील चांदजकर, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक गोविंद पवार, नितीन कापसे, डीव्हीपी बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक, अॅड. कुलदीप पाटील, आकाश पाटील, महेंद्र पाटील, सरपंच सतीश केचे, दत्तराज नवले, सुरेश पाटील, भाऊसाहेब काळे, दादासाहेब कळसाईत, सतीश काळे, श्रीमंत केचे, गणेश सोलनकर, विकास दडस, रमेश लवटे, महावीर कांबळे आदी उपस्थित होते.

चौकट : मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा

"शेतकरी अगोदरच विविध संकटांचा सातत्याने सामना करत आहेत. त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. हातात आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या कठीण काळात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मदतीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू."
आ. अभिजित पाटील

लहान शीर्षक : वादळी पावसाने बागायतींचे नुकसान; आ. पाटीलांनी घेतली पाहणी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages