एमआयडीसीत कामगाराचा अपघाती मृत्यू
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील ‘लेक एक्झिम’ या कारखान्यात काम करत असताना उंच पत्र्यावरून खाली पडल्याने एका ३१ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण हणमंत अंजनाळकर (वय ३१, रा. समरनगर, बसवेश्वर चौक, एमआयडीसी) असे मृत कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण अंजनाळकर हे शनिवारी दुपारी कारखान्यातील सुमारे १८ ते २० फूट उंचीवरील पत्र्यावर चढून काम करीत होते. यावेळी अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, कारखाना प्रशासनाकडून कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या अपघाताबाबत चौकशीची मागणीही करण्यात येत आहे.
प्रवीण अंजनाळकर हे दुपारी घरून जेवण करून नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
या प्रकरणाची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment