सोलापूर विधान परिषद निवडणुकीत रंगत; राऊत-देशमुख यांच्यात थेट सामना
भाजपच्या बिनविरोध प्रयत्नांना अपयश, महाविकास आघाडीची उमेदवारी कायम
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न अखेर निष्फळ ठरल्यानंतर आता भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत आता चांगलीच राजकीय रंगत निर्माण झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेत विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक अटळ ठरली.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करत महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असल्याने निवडणूक पूर्ण ताकदीने लढविली जाईल, असे सांगितले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही महायुतीचा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल, असा दावा केला आहे.
दरम्यान, माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव देशमुख यांच्यातील ही लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या मतांवर निकालाचे गणित अवलंबून असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार रणनीती आखली जात आहे.
महायुतीचे बलाबल
भाजप – ३०७
शिवसेना (शिंदे गट) – ७६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ५१
एकूण – ४३४
महाविकास आघाडीचे बलाबल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ३१
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – २९
काँग्रेस – १८
एकूण – ७८
तर एमआयएम व इतर पक्षांकडे १०४ मते असल्याचे चित्र आहे.
१८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी प्रांताधिकारी कार्यालयात मतदान होणार असून २२ जून रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment