घरगुती गॅस सिलिंडर २९ रुपयांनी महाग; सर्वसामान्यांच्या बजेटवर वाढीव ताण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

घरगुती गॅस सिलिंडर २९ रुपयांनी महाग; सर्वसामान्यांच्या बजेटवर वाढीव ताण

 घरगुती गॅस सिलिंडर २९ रुपयांनी महाग; सर्वसामान्यांच्या बजेटवर वाढीव ताण

महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकघराचा खर्च वाढणार


नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त) : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ जाहीर केली असून नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे घरगुती खर्चात वाढ होणार असून सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे.
नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४२ रुपये झाली आहे. कोलकात्यात ग्राहकांना ९६८ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई आणि पुण्यात सिलिंडरचा दर ९४१.५० रुपयांवर पोहोचला असून चेन्नईमध्ये हा दर ९५७.५० रुपये झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता घरगुती गॅसच्या दरवाढीची भर पडल्याने मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांची चिंता वाढली आहे. स्वयंपाकघराचा खर्च वाढल्याने घरगुती अर्थकारणावर त्याचा परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती, तर जून महिन्याच्या सुरुवातीलाही त्यात पुन्हा वाढ करण्यात आली. आता घरगुती सिलिंडरच्या दरवाढीमुळे महागाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, इराणमधील संघर्ष आणि जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरील वाढत्या दबावामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. तथापि, देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही भागात तुटवड्याची स्थिती निर्माण झालेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages