दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
नागपूर (कटूसत्य वृत्त) : राज्यात १५ जूनपर्यंत नैर्ऋत्य मान्सूनचा विस्तार होण्याची शक्यता असून त्यानंतर समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या नैर्ऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या माहितीनुसार, किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीसाठी पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या स्थितीचा योग्य आढावा घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा सरासरीच्या सुमारे ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम बाळगणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. पाऊस कमी झाला तरी शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी होण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment