आई, वडील व शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे हितचिंतक : नगराध्यक्षा जयश्री भिसे
कुर्डुवाडीत ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे ५८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त) : आई-वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच चिंता असते. मात्र आजची पिढी अनेकदा त्यांच्या भावना समजून घेत नाही. आई, वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे हितचिंतक असून त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कुर्डुवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रविवारी पंचायत समिती येथील कै. विठ्ठलराव शिंदे सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या कुर्डुवाडी शहरातील ५८ विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात नगराध्यक्षा जयश्री भिसे, हनुमंतराव गिड्डे, गटनेते प्रा. डॉ. आशिष रजपूत, नगरपालिकेचे आरोग्य सभापती डॉ. मोहसीन मकणु, शिक्षण सभापती संजय टोणपे, बापूसाहेब जगताप, बापूसाहेब क्षीरसागर, वाहिद शेख, गणेश व्यवहारे, किरण गोडसे, उत्तम वाळूजर, अर्जुन गाडे आणि राहुल धोका यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग, पेन, प्रशस्तीपत्र आणि मोत्यांची माळ देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमास जयश्री करंजकर, मंगल ढवळे, नारायण करंजकर, शंकर सुतार, पांडुरंग शिंदे, मगनदास काळे, वसंत मुंडवे, गौतम वाघमारे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment