पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत प्राथमिक शाळेचा प्रवेशोत्सव साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शाळेच्या प्रथम दिवशी निमित्त प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर, ता. उत्तर सोलापूर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.
अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेविका सौ अलका आनंद भवर, चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस उपनिरीक्षक आनंद भवर, पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ लक्ष्मी कनकधर, उपाध्यक्ष प्रज्ञा राऊत, मान्यवर उपस्थित होते.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बोलताना विद्यार्थ्यांना जीवनात मोठे होण्यासाठी भरपूर अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तकांना मित्र बनवले पाहिजे. सरकारी शाळेत शिकून अनेकजण मोठ्या हुद्यावर काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि शाळेचा हिरवागार परिसर येथे आनंदी वातावरणात शिक्षणाची उत्तम संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या दिवसाचे महत्त्व वयाने मोठे झाल्यावर विद्यार्थ्यांना नक्की कळेल, असे त्यांनी पुढे म्हटले.
कार्यक्रमात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्कुल बॅग, गणवेश, शूज आणि पाठ्य पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाआधी सजविलेल्या जीपमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी व औक्षण करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. तसेच आनंद भंवर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमात आनंद भंवर आणि इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात जिल्हा परिषद सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धाराम माशाळे यांनी केले. सूत्रसंचालन शिवशंकर राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती रसिका बंदिछोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक काळे, श्रीमती वैशाली गोंदकर, श्रीमती विद्या वरडुळे, शिवाजी वडते यांनी परिश्रम घेतले.
.png)
No comments:
Post a Comment