२५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार– कॉ. आडम मास्तर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

२५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार– कॉ. आडम मास्तर

 २५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार– कॉ. आडम मास्तर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेले प्रतिदिन ४०२ रुपये किमान वेतन तात्काळ लागू करावे, कामगारांवर दबाव टाकून संमतीपत्रे घेण्याचे प्रकार थांबवावेत तसेच कॉ. गोदुताई परुळेकर नगर व रे नगर येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर ते मुंबई मंत्रालयावर २५ हजार कामगारांसह भव्य ‘घरकुल दिंडी’ काढण्यात येईल, अशी घोषणा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली.

सिटू संलग्न लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि. १५) रोजी कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना कॉ. आडम म्हणाले की, अनेक विडी कारखानदार कामगारांवर शासनाचे किमान वेतन नाकारण्यासाठी दबाव टाकत असून जबरदस्तीने संमतीपत्रे घेण्याचे प्रकार सुरू आहेत. ही कृती कामगारांच्या वैधानिक हक्कांवर गदा आणणारी असून ती तात्काळ थांबविणे आवश्यक आहे.

कॉ. एम.एच. शेख यांनी सांगितले की, विडी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी लाल बावटा विडी कामगार युनियन गेली २९ वर्षे संघर्ष करत आहे. शासनाने २०१४ मध्ये किमान वेतन अधिसूचित केले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

निवेदनातील प्रमुख मागण्या म्हणजे सर्व विडी उद्योगांची तात्काळ तपासणी करून कामगारांवरील दबाव थांबविणे, जबरदस्तीने घेतलेली संमतीपत्रे कायदेशीरदृष्ट्या अमान्य घोषित करणे, प्रतिदिन ४०२ रुपये किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करणे, दोषी कारखानदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणे, दबाव किंवा भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध कठोर निर्देश जारी करणे तसेच विशेष चौकशी मोहीम राबवून अहवाल सार्वजनिक करणे या होत्या.

या आंदोलनात सिटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख (मेजर), नसीमा शेख, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने विडी कामगार सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे, विल्यम ससाणे, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला,रफिक काझी, आप्पाशा चांगले, बालाजी तुम्मा, वसीम देशमुख, हसन शेख, वीरेंद्र पद्मा, नरेश दुगाने, नरसिंग बुगले, मल्लेशम कारमपुरी, नरेश गुल्लापल्ली, चंटी बिटला, योगेश आकिम, दिनेश बडगु, बालाजी गुंडे, शिवा श्रीराम, बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, राधागोपाल बंडी, प्रकाश कुऱ्हाडकर, श्रीनिवास तंगडगी आणि प्रशांत विटे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages