भंगार चोरी प्रकरण : नगर अभियंत्यासह १२ जणांना कारणे दाखवा नोटीस
खुलासा सादर करण्यासाठी ४८ तासांची मुदत
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या भंगाराच्या चोरीप्रकरणी चौकशी समितीने गंभीर ठपका ठेवत नगर अभियंत्यासह १२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी बुधवारी संबंधितांना नोटीस जारी करून ४८ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह आठ जणांविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चौकशी समितीने भंगारगृहातील चोरी आणि त्यासंबंधित गैरप्रकारांबाबत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये नगर अभियंता सारिका आकुलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, उपअभियंता अविनाश वाघमारे, अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, लिपिक अशोक बिराजदार, विनोद चंदनशिवे, सचिन गाडे, गौतम लोखंडे, विश्वजित कांबळे यांच्यासह बी.व्ही. इंडिया आणि शिवकृपा कॉर्पोरेट कंपनीच्या व्यवस्थापकांचा समावेश आहे.
चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि देखरेखीतील त्रुटींमुळे भंगार चोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व संबंधितांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी आपला थेट संबंध नसल्याचा दावा केला असून, ते आपली भूमिका खुलाशाद्वारे मांडणार असल्याचे समजते.

No comments:
Post a Comment