सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शहरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महावितरणचे शहर कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांची भेट घेऊन विविध तक्रारींबाबत जाब विचारला.
सोलापूर शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरणने खासगी कंपन्यांकडे सोपविले आहे. या कंपन्यांकडून काही ठिकाणी ग्राहकांना दबाव टाकून तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याच्या तक्रारी उद्धवसेनेकडे प्राप्त झाल्या होत्या.
यासंदर्भात उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. ग्राहकांची संमती न घेता आणि योग्य माहिती न देता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, संतोष कंगनाळकर, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंगलताई थोरात, लोकसभा प्रमुख संजय पौळ, विष्णू कारमपुरी, सुरेश जगताप, राजाभाऊ कुसेकर, दत्ता खलाटे, उज्ज्वल दीक्षित, दिनेश चव्हाण, हुकूमचंद राठोड, चंद्रकांत मानवी, उदय पवार, बबलू पंडित, लहू गायकवाड, शकील अत्तार, मोहम्मद मुलानी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्राहकांवर जबरदस्ती करू नका : उद्धवसेना
यावेळी कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी शिवसेनेच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच, सोसायटी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच स्मार्ट मीटर बसविण्यात येतील, असे स्पष्ट केले. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेतली.
दरम्यान, ग्राहकांवर जबरदस्ती करून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

No comments:
Post a Comment