मनपा शाळा क्र.29 मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29, भवानीपेठ येथील विद्यार्थ्यांना अपरिचित सामाजिक संस्था वएचडीएफसी बँक व कोटक बँक अधिकारी मित्र परिवारातर्फे सालाबादप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अपरिचित बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर गवते यांच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदाही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी अनिरुद्ध पालखे, प्रकाश पाटील, लक्ष्मण शिंदे, अनमोल धवलशंक, विकास इंगळे, अंकिता कामुनी, रुपेश दुधनी, अक्षय कांबळे, संकेत बावळे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन पुणे प्रादेशिक संघटक सुनील काळे व मयूर गवते हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मयूर गवते यांनी अपरिचित सामाजिक संस्था गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून आजची मदत शिक्षणाची खरी गरज असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे समाधान असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला निश्चितच मोलाची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनोगत व्यक्त करताना लक्ष्मण शिंदे यांनी मनपा शाळांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “शाळेचे एक आदर्श मॉडेल तयार करा, त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. मनपा शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण सरकारी शाळांमधून मिळते. येथे कोणताही इंटरव्ह्यू न घेता विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्यांच्या गुणवत्तेचा विकास केला जातो. याउलट अनेक खाजगी शाळांमध्ये गुणवत्ता पाहून प्रवेश दिला जातो व भरमसाठ शुल्क आकारले जाते,” असे त्यांनी नमूद केले.
मुख्याध्यापक नवनाथ माळी यांनी शाळेची ओळख करून देताना विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये मिळविलेल्या यशाची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण डोके यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश हिंगणे यांनी केले.
.png)
No comments:
Post a Comment