कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे विषारी धुराने परिसर गुदमरला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 13, 2026

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे विषारी धुराने परिसर गुदमरला

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे 
विषारी धुराने परिसर गुदमरला

नियम धाब्यावर बसवून मार्केट कमिटीकडून 
प्लास्टिक कचऱ्याची जाळपोळ

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि पर्यावरणविरोधी कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मार्केट यार्डच्या पाठीमागील भिंतीलगत मोठ्या प्रमाणात संपूर्ण मार्केटमधील प्लास्टिक व कागदी कचरा टाकला जात असून, या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो सर्रास पेटवून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांकडूनच हा प्लास्टिक कचरा गोळा करून त्याला आग लावण्यात येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरत आहे. या धुरामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक जाळणे हे कायद्याने गुन्हा असतानाही मार्केट कमिटीकडून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
दररोज हजारो नागरिक, व्यापारी, हमाल आणि शेतकरी ये-जा करत असलेल्या मार्केट यार्ड परिसरात अशा प्रकारे विषारी धूर निर्माण करून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. प्लास्टिक जाळल्याने हवेत घातक रसायने मिसळून श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र याकडे मार्केट कमिटी प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
पर्यावरण संरक्षणाचे नियम पायदळी तुडवत सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. “सामान्य नागरिकांनी कचरा जाळला तर दंड आणि कारवाई केली जाते, मग मार्केट कमिटीला कायद्यापेक्षा वेगळे नियम आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून प्लास्टिक कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. तसेच मार्केट यार्ड परिसरातील कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही पुढे येत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages