अंगणवाडी, शाळा दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांना झाडे लावणे बंधनकारक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील विकासकामांना पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदारांना आता वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजित पवार यांच्या पुढाकारातून आकार घेत आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रत्येक वर्क ऑर्डरमध्ये संबंधित ठेकेदारांनी किमान पाच ते कमाल ५० झाडे लावावीत, अशी अट समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे. केवळ झाडे लावण्यावर न थांबता त्यांचे संवर्धन आणि प्रत्यक्ष पडताळणीची जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे.
अंगणवाडी, शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात उपलब्ध जागेचा विचार करून किती झाडे लावावीत हे ठरवले जाणार आहे. संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वृक्षलागवडीचे फोटो ऑनलाइन अपलोड केल्यानंतरच ठेकेदारांची बिले मंजूर करण्याची अट घालण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
ग्रामीण भागात वाढते तापमान, घटती हरितपट्टी आणि पावसातील अनियमितता या पार्श्वभूमीवर विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारी इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाल्यास सावली, स्वच्छ हवा आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद स्तरावर अशा प्रकारची अट प्रथमच लागू होत आहे. विकासासोबत पर्यावरण संरक्षण हा संदेश देणारा हा निर्णय ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागात वृक्षलागवडीची व्यापक चळवळ उभी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, विकासकामांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
.png)
No comments:
Post a Comment