इंद्रजित पवारांचे निर्देश; शिवरायांचा पुतळा होणार अधिक आकर्षक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील जिल्हा परिषद उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे चारही बाजूंनी स्पष्ट व भव्य दर्शन होईल, अशी विशेष व्यवस्था तातडीने करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती इंद्रजित पवार यांनी दिले.
मंगळवारी झालेल्या अर्थ समितीच्या सभेत पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध आर्थिक व प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या नवीन शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. यानंतर मार्च २०२५ अखेरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हस्तांतरण, अभिकरण आणि सेस योजनांच्या जमा-खर्चाचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
विविध योजनांच्या निधी वापरासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्याभोवती सुयोग्य नियोजन करून नागरिकांना सर्व बाजूंनी पुतळ्याचे दर्शन घेता येईल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सभेला जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, पूनम इंगवले, रेश्मा डोके, केराप्पा पांढरे, वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे, भाजप उत्तर तालुका अध्यक्ष संभाजी दडे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment