सर्व विषयांत मिळवले प्रत्येकी ३५ गुण!
ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील निकिता कुचेकरची अनोखी कामगिरी चर्चेत
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. राज्यभरात गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची चर्चा सुरू असताना सोलापूरातील एका विद्यार्थिनीच्या अनोख्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने दहावीच्या सर्व विषयांत प्रत्येकी ३५ गुण मिळवत एक आगळीवेगळी नोंद केली आहे.
निकिताला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच समाजशास्त्र या सर्व विषयांमध्ये समान गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विषयात अगदी तंतोतंत ३५ गुण मिळाल्याने तिच्या निकालाची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत एकसारखे गुण मिळणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जात असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही या निकालाचे विशेष आश्चर्य वाटत आहे.
निकिताच्या या वेगळ्या निकालामुळे शाळेतही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून मित्रपरिवाराने तिचे अभिनंदन केले आहे. “सर्व विषयांत समान गुण मिळणे हीदेखील एक अनोखी कामगिरीच आहे,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
शिक्षकांनीही निकिताच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निकालात वेगळेपणा जपणाऱ्या निकिताची ही अनोखी नोंद आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थी उच्च गुणांनी झळकले असले तरी निकिताच्या या ‘समान गुणांच्या योगायोगाने’ सोलापूर जिल्ह्यात वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे.
.png)
No comments:
Post a Comment