शासकीय कार्यक्रमातून राजन पाटील यांना डावलल्याचा आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

शासकीय कार्यक्रमातून राजन पाटील यांना डावलल्याचा आरोप

  शासकीय कार्यक्रमातून राजन पाटील यांना डावलल्याचा आरोप 

मोहोळमध्ये राजकीय वातावरण तापले; कार्यकर्त्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा




मोहोळ (कटूसत्य वृत्त) :-मोहोळ तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” या शासकीय कार्यक्रमावरून तालुक्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री दर्जा प्राप्त माजी आमदार राजन पाटील यांचे नाव अधिकृत बॅनरवर नसल्याने आणि त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात न आल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मोहोळ तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय समाधान शिबिराच्या बॅनरवर विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची नावे ठळकपणे झळकत असताना राज्य मंत्री दर्जाच्या नेत्याचे नाव मात्र पूर्णपणे गायब असल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या महत्त्वाच्या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार स्थान मिळणे अपेक्षित असतानाही राजन पाटील यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

“राज्य मंत्री दर्जाच्या नेत्याला शासकीय कार्यक्रमातून वगळणे हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून ठरवून केलेला राजकीय अपमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही कार्यकर्त्यांनी प्रशासनावर थेट राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप करत “कोणाच्या सांगण्यावरून नाव हटविण्यात आले?” असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, समाधान शिबिराच्या मूळ उद्देशापेक्षा आता बॅनरवरील नाव गायब असल्याचीच चर्चा तालुकाभर रंगली आहे. संबंधित बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून “राजकीय सूडबुद्धीचा प्रकार”, “मोहोळच्या राजकारणातील नवा संघर्ष”, “प्रोटोकॉलचा अपमान” अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजन पाटील हे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष असून त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे अशा वरिष्ठ पदाधिकाऱ्याला शासकीय कार्यक्रमातून वगळणे ही गंभीर बाब मानली जात आहे. “शासनाचा प्रोटोकॉल मोडण्यात आला का?”, “प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले का?” असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

या प्रकरणामुळे राजन पाटील समर्थकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून काही कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. “मोहोळ तालुक्यात राजकीय द्वेषातून प्रशासनाचा वापर केला जात आहे. या प्रकाराची वरिष्ठ स्तरावर तक्रार केली जाईल,” असा इशारा काही पदाधिकाऱ्यांनी दिला.

विशेष म्हणजे महसूल विभागाच्या “समाधान शिबिरा”तूनच आता असंतोषाचा उद्रेक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बॅनरमुळे मोहोळच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात या वादाचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages