वडिलांच्या अंत्यदर्शनाआधी दिली परीक्षा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

वडिलांच्या अंत्यदर्शनाआधी दिली परीक्षा

 वडिलांच्या अंत्यदर्शनाआधी दिली परीक्षा

दुःखावर मात करत सोलापूरच्या धनश्रीने मराठीत मिळवले ६५ गुण




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- दहावीच्या परीक्षेचा काळ, घरातील तणाव आणि त्यातच वडिलांच्या निधनाचा जबर धक्का… अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही जिद्द न हरवता परीक्षा देणाऱ्या सोलापूरच्या धनश्री पवार हिची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वडिलांच्या अंत्यदर्शनाआधी परीक्षा केंद्रावर जाऊन मराठीचा पेपर लिहिणाऱ्या धनश्रीला आज जाहीर झालेल्या निकालात मराठी विषयात ६५ गुण मिळाले असून ती उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या धनश्री पवार हिच्या आयुष्यात २० फेब्रुवारी २०२६ हा दिवस मोठे दुःख घेऊन आला. तिचे वडील भिकाजी पवार यांचे अचानक निधन झाले. घरात अंत्यविधीची तयारी सुरू होती, नातेवाईक जमले होते आणि संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालेले असताना दुसरीकडे धनश्रीसमोर दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरचे आव्हान उभे होते.

अशा प्रसंगी अनेकजण मानसिकदृष्ट्या खचून गेले असते; मात्र धनश्रीच्या आयुष्यात शिक्षकांनी आधाराचा हात दिला. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत धनश्री व तिच्या नातेवाईकांची समजूत काढली. त्यांनी अंत्यविधी सुमारे दोन तास पुढे ढकलण्याची विनंती केली आणि स्वतः धनश्रीला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले.

वडिलांच्या निधनाचे दुःख मनात असतानाही धनश्रीने धैर्य एकवटत परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. अत्यंत तणावपूर्ण मानसिक अवस्थेत तिने तब्बल दीड तास मराठीचा पेपर लिहिला. त्यानंतर पेपर अर्ध्यातूनच सोडून ती घरी परतली आणि वडिलांच्या अंत्यविधीत सहभागी झाली.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धनश्रीने मराठी विषयात ६५ गुण मिळवत उत्तीर्णता मिळवली. तिच्या संघर्षमय प्रवासाने शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक भावूक झाले असून सोशल मीडियावरही तिच्या जिद्दीची चर्चा सुरू आहे.

धनश्रीच्या या यशानंतर शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने, शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्कीन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा आणि वैशाली सोनटक्के यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केला. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला शुभेच्छाही देण्यात आल्या.

दरम्यान, दहावीनंतर व्होकेशनल अभ्यासक्रमांतर्गत एमएलटी कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, अशी भावना धनश्रीने यावेळी व्यक्त केली. तिच्या या निर्धाराने उपस्थितांचे डोळे पाणावले.

यावेळी तिची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय पवार तसेच नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेली मोठी बहीण वैष्णवी पवार उपस्थित होते. धनश्रीच्या जिद्दीला आणि संघर्षाला समाजातून सलाम केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages