मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेचा लाभासाठी अर्ज करावे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के (कमाल मर्यादा रक्कम रू. ३.१५ लक्ष) शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येईल. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याची कमाल मर्यादा रक्कम रू.३.५० लक्ष इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रक्कमेच्या १० टक्के म्हणजे रक्कम रू. ३५,०००/- स्वहिस्सा भरल्यानंतर सदर योजनेचा लाभघेता येईल.
अटी व शर्ती
बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
बचत गटातील ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत तसेच बचत गटाचे
अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे.
सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व डोमासाईल प्रमाणपत्र आवश्यक आहे. या अगोदर संबंधीत बचत गटाने सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच यापुर्वी सदर योजनेचा लाभ
घेतला नसलेबाबतचे हमीपत्र आवश्यक आहे.
बचत गटाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
मिनी ट्रॅक्टर व ट्रेलर यांची नोंदणी आर.टी.ओ कार्यालयात करणे बंधनकारक आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या विहित नमुन्यातील अर्जासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे दि. 15 जून 2026 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीम. सुलोचना सोनवणे, यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment