करमाळा-वाशिंबे बसची डिझेल टाकी अचानक तुटून पडली; मोठा अनर्थ टळला
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा-वाशिंबे ही बस नेहमीप्रमाणे आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान करमाळा बस स्थानकावरून मार्गस्थ झाली होती. बस शहरातून पुढे जात असताना सिद्धार्थ नगर परिसरात अचानक बसची डिझेल टाकी तुटून रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेवेळी बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. विशेष म्हणजे काही वृद्ध नागरिक देखील बसमध्ये होते. अचानक मोठा आवाज होऊन डिझेल टाकी खाली पडल्याने बसमधील प्रवासी घाबरून गेले. टाकी तुटून पडल्यामुळे त्यामधील काही डिझेल रस्त्यावर सांडले. ही घटना अत्यंत धोकादायक मानली जात असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
सुदैवाने चालकाने वेळीच बस थांबवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसची अशी अवस्था पाहून प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बसच्या देखभाल व दुरुस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, करमाळा आगार सज्जनसिंह चव्हाण यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, “डिझेल टाकी नेमकी कशामुळे तुटून पडली याची सखोल पाहणी करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”
दरम्यान, करमाळा आगाराच्या अनेक बसेस वारंवार बंद पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. करमाळा आगाराला जुन्या झालेल्या तसेच इतर ठिकाणी वापरून झालेल्या बसेस दिल्या जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यापूर्वीही लांब पल्ल्याच्या बसेस करमाळा तालुक्यातच बंद पडून पुन्हा डेपोमध्ये परत आणण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तसेच करमाळा आगार प्रमुखांनी अशा नादुरुस्त बसेसची नियमित पाहणी करून बस प्रवासासाठी पूर्णपणे सुरक्षित व खात्रीशीर आहे का याची तपासणी केल्यानंतरच त्या डेपोबाहेर सोडाव्यात, अशी मागणी देखील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर करमाळा डेपोला आता तरी नवीन व चांगल्या दर्जाच्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment