चित्रकार जितेश मोरे साकारणार “शिवबा” चित्रमालिका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

चित्रकार जितेश मोरे साकारणार “शिवबा” चित्रमालिका

 चित्रकार जितेश मोरे साकारणार “शिवबा” चित्रमालिका  



३० भव्य कॅनव्हास पेंटिंग्जमधून उलगडणार छत्रपती शिवरायांचे दुर्मिळ पैलू 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी, ऐतिहासिक आणि क्वचितच चित्रित झालेले प्रसंग कलात्मक माध्यमातून उलगडणारी “शिवबा” ही  चित्रमालिका सोलापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार जितेश मोरे यांनी सुरू केली आहे. या मालिकेतील पहिले ऐतिहासिक आशयाने समृद्ध कॅनव्हास पेंटिंग साकारत त्यांनी शिवरायांच्या राजनैतिक नेतृत्वाचा प्रभावी पैलू उभा केला आहे. या मालिकेत एकूण ३० कॅनव्हास पेंटिंग्ज ते साकारणार आहेत.
          महापुरुषांच्या जीवनावरील प्रभावी कलाकृतींसाठी ओळखले जाणारे चित्रकार जितेश मोरे “शिवबा” या चित्र मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सुमारे ३० भव्य कॅनव्हास पेंटिंग्ज साकारणार आहेत. सोलापुरातील चित्रकार जितेश मोरे यांनी गेल्या ३० वर्षांपासून चित्रकलेची अखंड साधना करत महापुरुषांची थीम केंद्रस्थानी ठेवत आजवर ५ हजारांहून अधिक चित्रे, प्रतिमा आणि कलाकृती साकारल्या आहेत. त्यांनी तयार केलेली तैलचित्रे, वॉल पेंटिंग आणि भव्य कटआउट्स सोलापूरसह विविध ठिकाणी आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत जितेश मोरे यांनी आपल्या कलेला सातत्य, मेहनत आणि वेगळेपणाची जोड दिली. १६ बाय २० इंचांपासून ते तब्बल ८० फूट उंचीपर्यंतच्या प्रतिमा, कटाऊटस त्यांनी रेखाटल्या असून, त्यांची चित्रे पाहताना ती जिवंत असल्याचा भास निर्माण होतो. विविध जयंती उत्सव, मंडळे, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कलाकृती पाहायला मिळतात.
           “शिवबा” चित्र मालिकेतील पहिल्या चित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज प्रतिनिधी यांच्यातील ऐतिहासिक दरबारातील प्रसंगाचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. चित्रात महाराज सिंहासनावर विराजमान असून, समोर इंग्रज अधिकारी आदरपूर्वक उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. सभोवताली उपस्थित मराठा सरदार, अंगरक्षक आणि दरबारी वातावरणामुळे शिवकालीन राजवैभव, प्रशासनातील शिस्त आणि स्वाभिमानी दरबार संस्कृतीचा प्रत्यय येतो. या चित्रातून मराठा साम्राज्याची शौर्यपरंपरा, छत्रपती शिवरायांची राजनैतिक दूरदृष्टी, प्रभावी नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील त्यांची भूमिका दर्शविण्यात आली आहे. सूक्ष्म तपशील, पारंपरिक रंगसंगती आणि वास्तववादी शैलीमुळे अतिशय आकर्षक आणि प्रेरणादायी वाटते, असे मोरे यांनी सांगितले. 


३ बाय ४.५ फुटाचे पहिले कॅनव्हास पेंटिंग तयार 

“शिवबा” कॅनव्हास चित्र मालिकेतील ३ बाय ४.५ फुटाचे पहिले कॅनव्हास पेंटिंग तयार केले आहे. ऑईल कलरचा उपयोग केला आहे. पहिल्या चित्रात राजनैतिक सामर्थ्य, स्वाभिमानी दरबार संस्कृतीचे चित्रण केले आहे. या मालिकेत ३० भव्य कॅनव्हास पेंटिंग्जमधून छत्रपती शिवरायांचे दुर्मिळ पैलू उलगडणार आहे. छत्रपती शिवरायांच्या राजनैतिक सामर्थ्याचा कॅनव्हासवर जणू जिवंत आविष्कार साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 
या सर्व चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती चित्रकार जितेश मोरे यांनी दिली.


चौकट-

 ‘शिवबा’ चित्र मालिकेची ही आहेत वैशिष्ट्ये 

 -- “शिवबा” चित्रमालिकेचा चित्रकार जितेश मोरे यांचा अनोखा उपक्रम

-- पहिल्या चित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज प्रतिनिधी दरबाराचा ऐतिहासिक प्रसंग

-- मालिकेत एकूण ३० कॅनव्हास पेंटिंग्ज  साकारणार 

-- इतिहास, कला आणि प्रेरणेचा संगम असलेल्या चित्राचे लवकरच भव्य प्रदर्शन 

--  राजनैतिक सामर्थ्य, स्वाभिमानी दरबार संस्कृतीचे चित्रण हे वैशिष्ट्य 

--  वास्तववादी चित्ररचना, सूक्ष्म बारकावे, पारंपरिक रंगसंगतीची शैली 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages