कामती परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

कामती परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा

 कामती परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा 

पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गटातील लांबोटी, कोळेगाव, अर्जुनसोंड, मुंढेवाडी आदी गावांना शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून गुरांसाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेडही उखडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य व इतर वस्तू भिजल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नागरिक कुटुंबासमवेत घरात जेवण करत असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेली. काही ठिकाणी पत्रे दूरवर जाऊन पडली, तर काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्य पूर्णपणे भिजून गेले.
वादळी वाऱ्यामुळे अर्जुनसोंड, मुंढेवाडी, कोळेगाव, लांबोटी परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली असून नुकसानग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकसानीची माहिती मिळताच भाजपाचे युवा नेते अक्षय खताळ यांनी तात्काळ प्रभावित गावांना भेट देत नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. तसेच प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त अनेक कुटुंबांच्या जेवणाचीही व्यवस्था केली.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या विमलताई तानाजीराजे खताळ व अक्षय खताळ यांनी महसूल प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याचीही मागणी स्थानिकांकडून होत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages