वादळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

वादळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

 वादळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले  

कुंभारी (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरात शनिवारी सायंकाळी व रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाने मोठा कहर केला. या अवकाळी संकटामुळे पपई, द्राक्षे, लिंबू तसेच विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

फळबाग पिके ही खर्चिक आणि दीर्घकालीन स्वरूपाची असतात. वर्षभर मेहनत घेऊन शेतकरी या पिकांची जपणूक करत असतात. तब्बल १२ ते १४ महिन्यांच्या कष्टानंतर उत्पादन हाती येण्याच्या टप्प्यावर असताना अचानक आलेल्या गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

कुंभारीसह दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागांमध्येही फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

फळबाग हे शेतकऱ्यांसाठी केवळ पीक नसून वर्षभराच्या कष्टाचे आणि आशेचे प्रतीक असते. केळी, पपई, द्राक्षे यांसारख्या पिकांसाठी पाणी, औषधे, खते आणि मजुरीवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. मात्र, एका तासाच्या गारपिटीने सर्व मेहनतीवर पाणी फिरले आहे.

"शासनाने केवळ पाहणी न करता तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा," अशी मागणी शेतकरी विपीन करजोळे यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages