Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर आणि शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर एक अतूट नातं

सोलापूर आणि शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर एक अतूट नातं





 

आज दिनांक ४ जानेवारी रोजी मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय शिवश्री पुुरूषोत्तम खेडेकर साहेबांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देताना आनंद आदर उत्साह प्रेरणा अशा संमिश्र भावना मनात निर्माण झाल्या.. खास करून सोलापूर जिल्ह्यात असणारा साहेबांचा हक्काचा प्रेमाचा आणि अधिकाराचा वावर प्रत्येकाच्या मनावर खोलवर कोरला गेला आहे. गेल्या पस्तीस वर्षांची साहेबांनी केलेली विचारांची पेरणी सोलापूरच्या दृष्टीने वैचारिक क्रांतीची ठरली आहे.
१ सप्टेंबर १९९० रोजी ॲड.शिवश्री पुरूषोत्तम खेडेकरसाहेबांनी काही सहकाऱ्यांच्या सोबतीने मराठा सेवा संघाची स्थापना केली. त्याचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा शाखा निर्माण करण्याचे नियोजन झाले. त्यानुसार ९ सप्टेंबर १९९० रोजी सोलापूर जिल्हा शाखेची स्थापना झाली. सोलापूर जिल्ह्याचे प्रथम अध्यक्ष म्हणून पंढरपूरचे आदरणीय शिवाजीराव पाटील यांची निवड झाली त्यांच्या सोबतीला आदरणीय रामराव ठोंगे पाटीलसाहेब, आर जी पाटीलसाहेब, तुकाराम मोरे, पा नी पवार , सदाशिवराव मोरे, मधुकर भोसले नंतरच्या काळात बाळासाहेब कदम आदी मंडळी तन मन धनाने कार्यरत होती. सोलापूर जिल्ह्यातील त्या काळातील साहेबांचे हे साथीदार आज हयात नाहीत परंतु त्यांचे अनमोल कार्य आजही त्यांची आठवण करून देते.
जिल्हा शाखेच्या स्थापने नंतर पाहता पाहता एस एन पाटील साहेबांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून शाखा स्थापन केल्या आणि खेडेकर साहेबांच्या बहुजनवादी पुरोगामी विचारांची गंगा गाव खेड्या पर्यंत पोहचली. जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आदी कक्षांसोबत पंढरपूर येथे पाहीले मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले. या वसती गृहामध्ये शेकडो गरजू मुलीची राहण्याची सोय झाली. खेड्यातील मुलींना त्याकाळात हक्काचे वसती गृह मिळाले. दत्त चौक सोलापूर येथे सेवा संघाचे स्वतःच्या मालकीचे कार्यालय सूरू केले. तिथे नियमित बैठका व प्रभोधांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासोबतीला जिल्हा कार्यक्षेत्र असणारी पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेतील युवकांना व महिलांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. आजवर हजारो युवक व महिलांनी याचा लाभ घेतला आहे. एस एन पाटीलसाहेब यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्याचा कामाचा हा वेग पाहता खेडेकर साहेबांनी सोलापूर जिल्ह्यावर खास लक्ष दिले . सोलापूर जिल्ह्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. १९९८ मधे पाच्छिम महाराष्ट्रातील मराठा सेवा संघाचे पाहिले आधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले. जील्ह्यातून आणि राज्यभरातून आधिवेशनाला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. आधिवेशनात अनेक मान्यवर वक्तयांनी मार्गदर्शन केले.
पुरोगामी विज्ञानवादी विचार अंधश्रद्धा जुन्या परंपरा यामुळे होणारे समाजाचे नुकसान याबाबत सखोल मार्गदर्शन झाले. त्यामुळे जिल्हाभर सेवा संघाची विचारधारा रुजण्यास मदत झाली.
संघटना बांधणी करण्यासाठी केडर बेस कार्यकर्त्यांची गरज असते याची खेडेकर साहेबांनी वारंवार जाणीव करून दिल्यामुळे जिल्ह्यात वेळोवेळी केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. मा म देशमुख सर आ ह साळुंके सर, अशोक राणा सर चंद्रशेखर शिखरे साहेब गंगाधर बनबरे,अशा विख्यात मान्यवरांचे प्रगल्भ मार्गदर्शन मिळाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विज्ञानवादी बहुजनवादी विचारांची एक भक्कम फळी निर्माण झाली. जिल्ह्यातील खास करून शहरातील जातीय सलोखा शांतता व समन्वय चांगला रहावा यासाठी खेडेकर साहेबांचे योगदान खूप मोठे आहे. साहेबांच्या पुढाकारातून सोलापूर मधे मुस्लिम दलीत इतर मागास वर्गातील घटक यांच्यामध्ये एकत्रित अशी वैचारिक बैठक तयार झाली. स्वतः खेडेकर साहेब या सर्व मंडळींशी सुरवातीपासून ते आज पर्यंत संपर्कात आहेत व योग्य समन्वय ठेवून बहुजन विचारधारा पुढे नेण्याचं काम करत आहेत. आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बहुजनवादी संघटनांचं एकमेकांशी असणारा सुसंवाद समन्वय साथ हे सगळं साहेबांच्या पुढाकारातून झाले. शिवजयंतीचा वाद सुरू असताना  १९ फेब्रुवारी हीच खरी शिव जन्माची  तारीख आहे हे मराठा सेवा संघाने पुराव्यानिशी सिद्ध करून शासनास १९ फेब्रुवारी हीच शिवजयंती जाहीर करण्यास भाग पाडले पण हे करत असताना  सर्वांना विश्वासात घेऊन हा विषय मार्गी लावला. त्यावेळीपासून आजतागायत सोलापुरातील शिव जयंतीला सर्व समावेशक रॅली काढली जाते. या रॅली मधे मराठा मुस्लिम दलीत ओबीसी अशा सर्वांचा सहभाग असतो, भगवा हिरवा निळा पिवळा आदी सर्व रंगांच्या झेंड्यासह ही रॅली सोलापुरातील विविध भागातून येऊन छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्या पर्यंत अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडते याचं सारं श्रेय जातं ते खेडेकर साहेबांना. कारण त्यांच्या समन्वयातून सर्व समाज घटक एक दिलाने एकत्र आले आहेत. सोलापूर शहर दंगलीमुळे बदनाम झाले होते पण मराठा सेवा संघ व इतर समाजाच्या समविचारी संघटनांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेच्या संघटनांची एक मूठ बांधली गेली त्यामधून नियमितपणे प्रबोधनाचे कार्यक्रम राबविण्यात आले समाजासमोर खरा इतिहास व वास्तव पोहचलं त्यामुळे गैरसमजुती मधून किंवा भावना भडकावून होणारे दंगलीचे प्रकार बंद झाले.
सोलापूर हे बहुभाषिक विविध जाती समुहांच शहर म्हणून ओळखलं जात. या पार्श्वभूमीवर सर्व समाज घटकांच्या  जागृतीसाठी साहेबांच्या सूचनेवरून सोलापूर मधे राष्ट्रीय शिक्षक परिषद, अखिल भारतीय शाहीर परिषद, अंतर राष्ट्रीय शिवधर्म परिषद आदींचे आयोजन करण्यात आले त्यामुळे सोलापुमध्ये पुरोगामी विचारांचे मंथन होऊन समाज जागृती होण्यास मदत झाली.. यामधे प्रामुख्याने शाहीर परिषदेचे भव्य दिव्य आणि अनोखं आयोजन सोलापूर मधे व्हावं ही खेडेकर साहेबांची इच्छा होती. आजच्या काळात दुर्लक्षित होत असलेली एक ऐतिहासिक लोककला म्हणजे शाहिरी होय. साहेबांनी शाहिरांच्या वेदना जाणल्या आणि अखिल भारतीय शाहीर परिषदेचं तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन सोलपुमध्ये केलं. साधारण पाचशे शाहीर व त्यांच्या सहकाऱ्यांचा मेळा सोलापुरात जमला  न भूतो न भविष्यती अशी ही शाहीर परिषद खेडेकर साहेबामुळे सोलापूरमध्ये उत्साहात पार पडली. सहभागी शाहिरांनी साहेबांचे अगदी गहिवरून आभार मानले आणि सोलापूरकरांना ही सुंदर आयोजनाबद्दल धन्यवाद दिले.
विविध आधिवेशना सोबतच जिजाऊ रथयात्रा, मराठा जोडो अभियान, शिव-शाहू वैचारिक संवाद यात्रा, नियमित संवाद दौरे या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून जिजाऊ शहाजीराजे आणि शिवशंभूचे कार्य तळागाळा पर्यंत पोहचविण्याचे कार्य आदरणीय खेडेकर साहेबांनी केले. खऱ्या अर्थाने मागील तीन दशकांत सोलापूर जिल्ह्यात चिकित्सा करणारी, विचारांची ठाम बैठक असणारी विज्ञानवादी पिढी घडविण्यात साहेबांचं खूप मोठं योगदान आहे.
गेल्या पस्तीस वर्षांचा युवकांच्या क्रयशक्तीचा लेखाजोखा मांडला तर खेडेकर साहेबांच्या प्रेरणेतून सोलापूर जिल्ह्यातून अनेक जण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वर्ग एक, वर्ग दोनचे आधिकरी झालेले दिसतात. खेडेकर साहेब नेहमी सांगतात की तेल मालीश पासून ते बुट पॉलिश पर्यंत कोणताही व्यवसाय करावा. त्यांच्या या अवाहनातून जिल्ह्यातील आज अनेक युवक वेगवेगळ्या व्यवसायात उत्तुंग यश मिळवताना दिसतात. इतकेच नाही तर राजकारणातही अनेकांनी आपलं बस्तान बसवलं आहे. अनेक विद्यार्थी आज देशात व परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. थोडक्यात सांगायचे तर खेडेकर साहेबांनी डोळ्यातच नव्हे तर डोक्यातही वास्तववादी विचारांचं आंजन घातलं म्हणून आज समाजात झालेले सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसतात.
सोलापूर जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यामध्ये साहेबांचं नियमित येणं जाणं असल्यामुळे साहेब अनेक कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात एव्हढच नव्हे तर कौटुंबिक नातंही तितक्याच आत्मीयतेने जपतात. जिल्ह्यात गाव खेड्यांपर्यंत साहेबांचा संपर्क   आहे त्यामुळे साहेब मुळचे सोलापूरचे आहेत का असा प्रश्न पडतो. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकरसाहेब आणि आदरणीय रेखाताई खेडेकर यांच्या ऋणानुबंधांचा अनमोल ठेवा सोलापुकरांना नेहमीच एक नवी ऊर्जा नवा उत्साह नवी प्रेरणा देणारा आहे. एक हक्काचा जिल्हा म्हणून साहेबांनी सोलापूरकडे पाहिलं आहे... सोलापूर साठी असणारं साहेबांचं योगदान बहुमूल्य आहे..
आजच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने तमाम सोलापूरकरांच्या वतीने साहेबांना  मनःपुर्वक अभिष्टचिंतन  व हार्दिक सदिच्छा, साहेबांना आयुरारोग्य लाभो सामाजिक कौटुंबिक सुख समृद्धी लाभो ही आई जिजाऊ चरणी प्रार्थना ....
धन्यवाद
 जय जिजाऊ
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय...


प्रशांत पाटील
विभागीय अध्यक्ष
मराठा सेवा संघ महाराष्ट्र
Reactions

Post a Comment

0 Comments