Hot Posts

6/recent/ticker-posts

महापौरपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच; ६ फेब्रुवारीला विशेष सभा

 महापौरपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच; ६ फेब्रुवारीला विशेष सभा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कौन्सिल हॉलमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सभेत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांची निवड केली जाणार आहे.

या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेले अपर जिल्हाधिकारी गणेश निहाळी काम पाहणार आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार असून, प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी ६ फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. त्याच दिवशी उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना हात वर करून मतदान केले जाईल.

१०२ सदस्यांच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे ८७ सदस्य असून, एमआयएमचे आठ, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चार, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजपला सत्तास्थापन करता येणार असून,विरोधी पक्षनेतेपद एमआयएमकडे जाण्याची शक्यता आहे.

विशेष सभेतच सभागृह नेता, विरोधी पक्षनेता व गटनेत्यांची घोषणा केली जाणार आहे. तसेच स्थायी समितीचे १६ व परिवहन समितीचे १२ सदस्य याच बैठकीत निवडले जाणार आहेत. नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.

महापौरपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच,यंदाचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.विनायक कोंडयाल, नरेंद्र काळे, अनंत जाधव, राजकुमार पाटील व रंजीता चाकोते यांची नावे चर्चेत असून, यापैकी एकाची पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपकडून अनपेक्षित नाव पुढे करून धक्कादायक खेळी खेळली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘शापित’ उपमहापौरपदासाठी उत्साह नाही,महापौरपदासाठी चुरस असली तरी उपमहापौरपदासाठी कोणत्याही नगरसेवकाची ठोस मागणी पुढे आलेली नाही. हे पद ‘शापित’ असल्याची भावना सदस्यांमध्ये असून, या पदावर बसलेल्या सदस्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते, अशी चर्चा आहे. त्यामुळे उपमहापौरपदासाठी अनिच्छा दिसून येत आहे.

भाजप गटनेत्याची निवड पुन्हा लांबणीवर भारतीय जनता पक्षाला अद्याप गटनेता निवडता आलेला नाही. नवनिर्वाचित सदस्यांची नोंदणी प्रक्रिया देखील रखडली आहे. आधी २८ जानेवारी, नंतर २९ जानेवारी अशी तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयातील कारणांमुळे नोंदणी पुढे ढकलण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील अंत्यसंस्कार कार्यक्रमामुळे ही प्रक्रिया आणखी पुढे ढकलण्यात आली असून, आता ३१ जानेवारी रोजी नोंदणी व गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे.

महापौर, उपमहापौर आणि गटनेत्याच्या निवडीमुळे सोलापूर महापालिकेतील सत्ताकारणाचा चित्र स्पष्ट होणार असून, ६ फेब्रुवारीची विशेष सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments