वटवृक्ष मंदिरात सोमवारी गुरुप्रतिपदा उत्सव; पालखी, भजन व महाप्रसादाचे आयोजन
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सोमवार, २ फेब्रुवारी रोजी माघ वद्य प्रतिपदानिमित्त गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी दर्शन, पूजा व महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरुप्रतिपदेच्या दिवशी पहाटे ५ वाजता ‘श्रीं’ची काकड आरती होणार असून, त्यानंतर पुरोहितांच्या हस्ते गुरुपूजन सोहळा संपन्न होईल. सकाळी ८ ते ९ या वेळेत देवस्थान समितीच्या वतीने जोतीबा मंडपात वैदिक मंत्रोच्चारात लघुरुद्र अभिषेक करण्यात येणार आहे. अभिषेकासाठी स्वामीभक्तांना सामूहिक बॅच पद्धतीने बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, अभिषेकानंतर श्रीफळ व प्रसाद देण्यात येणार आहे.
सकाळी ११.३० वाजता ‘श्रीं’ची महानैवेद्य आरती होईल. त्यानंतर देवस्थानच्या मँदगी–गाणगापूर रोडवरील भक्तनिवासात दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व स्वामीभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्या व सवाद्य पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. वटवृक्ष मंदिरातून निघणारा हा पालखी सोहळा फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, बुधवार पेठ, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरू मंदिर, भारत गल्ली व स्वामी गल्ली मार्गे रात्री साडे नऊ वाजता पुन्हा वटवृक्ष मंदिरात दाखल होईल. पालखी सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करून गुरुप्रतिपदा उत्सवाची सांगता होणार आहे.
सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, गर्दीचे नियोजन व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्ताची मागणी ही करण्यात आली आहे.
गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त पालखी सोहळा, दर्शन व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
.png)
0 Comments