Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदार यादीत २८,९०८ दुबार नोंदी; २० हजारांकडून हमीपत्रे

 मतदार यादीत २८,९०८ दुबार नोंदी; २० हजारांकडून हमीपत्रे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक मतदार यादीत मोठ्या प्रमाणात दुबार नोंदी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात तब्बल २८ हजार ९०८ मतदारांची नावे दुबार नोंदलेली असल्याचे समोर आले असून, यापैकी २० हजार मतदारांकडून लेखी हमीपत्रे घेण्यात आली आहेत. दुबार नोंद असलेल्या मतदारांना आता फक्त एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

दुबार मतदार ओळखण्यासाठी प्रशासनाने मतदार यादीत संबंधित नावांसमोर ‘डबल स्टार’ असे चिन्ह लावले आहे. अशा मतदारांनी केवळ एका ठिकाणीच मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली जात असून, दुबार नावे असलेल्या मतदारांना कोणते नाव कायम ठेवायचे व कोणते वगळायचे याचा निर्णय स्वतः घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

या प्रक्रियेनुसार मतदान कर्मचारी संबंधित मतदारांकडून लेखी हमीपत्रे भरून घेत आहेत. अद्याप उर्वरित दुबार नोंदी असलेल्या मतदारांकडूनही लवकरात लवकर हमीपत्रे घेण्याचे काम सुरू असून,निवडणुकीपूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी दुबार नोंदी हटवणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित दुबार मतदारांनी प्रशासनास सहकार्य करून त्वरित हमीपत्रे द्यावीत, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments