माळशिरस पंचायत समिती सभापतिपदी शिवसेनेचे दत्तात्रय मगर; उपसभापतिपदी मनीषा पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

माळशिरस पंचायत समिती सभापतिपदी शिवसेनेचे दत्तात्रय मगर; उपसभापतिपदी मनीषा पाटील

 माळशिरस पंचायत समिती सभापतिपदी शिवसेनेचे दत्तात्रय मगर; उपसभापतिपदी मनीषा पाटील

अकलूज (कटूसत्य वृत्त): माळशिरस पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेना (शिंदे गट) चे दत्तात्रय मगर यांची तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या मनीषा पाटील यांची मतदानाद्वारे निवड झाली.

माळशिरस पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली. सकाळी ११ वाजता सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, शिवसेना (शिंदे गट) चे दत्तात्रय मगर आणि भाजपच्या ऋतुजा पराडे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून मनीषा मदने-पाटील आणि भाजपतर्फे आनंद शेंडगे यांनी अर्ज दाखल केले होते.

यानंतर वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुपारी दोन वाजता सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक घेण्यात आली. सभापतिपदासाठी दोन आणि उपसभापतिपदासाठी दोन उमेदवार असल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले.

सभापतिपदासाठी दत्तात्रय मगर यांना १२ सदस्यांनी पसंती दिली, तर ऋतुजा पराडे-पाटील यांना ६ सदस्यांनी मत दिले. त्यामुळे मगर यांची सभापतिपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी जाहीर केले. त्यानंतर उपसभापतिपदासाठी झालेल्या मतदानात मनीषा पाटील यांना १२ सदस्यांनी तर भाजपचे आनंद शेंडगे यांना ६ सदस्यांनी पसंती दर्शवली. यामुळे मनीषा पाटील यांच्या उपसभापतिपदी निवडीची घोषणा करण्यात आली.

माळशिरस तालुक्यात पंचायत समितीची निवडणूक मोहिते-पाटील गट आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या आघाडीतून लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे २ आणि शिवसेना (शिंदे गट) चे २ असे एकूण १२ सदस्य निवडून आले, तर भाजपचे ६ सदस्य निवडून आले.

निवडीनंतर नव्याने निवडून आलेल्या सभापती व उपसभापती यांचा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विष्णू नारनवर, मिलिंद सरतापे, प्रताप पाटील, मच्छिंद्र ठवरे, जीवन जानकर, माउली पाटील, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे आदी उपस्थित होते.

चौकट : जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे एकमेव सभापती

माळशिरस पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेना (शिंदे गट) चे दत्तात्रय मगर यांची निवड झाल्याने पंचायत समितीवर शिंदे शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. सोलापूर जिल्ह्यात दत्तात्रय मगर हे शिंदे गटाचे एकमेव पंचायत समिती सभापती ठरले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages