मुंबईत इंडिया आर्ट फेस्टिव्हल : समकालीन भारतीय कलेचा भव्य कलाउत्सव संपन्न
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ | नेहरू सेंटर, वरळी
मुंबई(कटूसत्य वृत्त):-३१ जानेवारी २०२६ : समकालीन भारतीय कलाउत्सव ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेहरू सेंटर, वरळी येथे मुंबईत दिमाखात पार पडला. देश-विदेशातील कलावंतांना एकत्र आणणाऱ्या या महोत्सवात भारतीय कलाकारांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृतींचे प्रभावी दर्शन घडले.
या भव्य कला महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक अनूप जलोटा, महाराणी प्रिती देवी ऑफ कच्छ आणि रवि महाडिक यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. कला, संगीत आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.
भारतीय कला महोत्सवाची ही मुंबईतील १४ वी, तर देशपातळीवरील ३७ वी आवृत्ती ठरली. स्वतंत्र कलाकार आणि कला दालनांना एकत्र आणणारे सर्वसमावेशक व्यासपीठ निर्माण करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, याच विचारसरणीमुळे इंडिया आर्ट फेस्टिव्हलने गेल्या पंधरा वर्षांत कलाक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुंबईसह दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आदी शहरांमध्येही या महोत्सवाने आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे.
३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कला संग्राहक आणि विशेष आमंत्रितांसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दोन दिवसांत हे प्रदर्शन सर्वसामान्य कला रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते.
या वर्षीच्या इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये ४५ कला दालनं, स्टुडिओज आणि आर्टिस्ट कलेक्टिवज सहभागी झाले होते. सुमारे ५५० कलाकारांच्या ४,५०० हून अधिक कलाकृती तब्बल १५० दालनांमधून सादर करण्यात आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रकार, शिल्पकार आणि त्यांच्या कलाकृती एकाच मंचावर पाहण्याची संधी कलाकार, संग्राहक आणि कला रसिकांसाठी विशेष ठरली.
२००८ साली स्थापन झालेल्या इंडिया आर्ट फेस्टिव्हलची संकल्पना ग्रामीण आणि निमशहरी भागांतील कलाकारांना मुक्त आणि सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आली होती. कालांतराने हा उपक्रम एक सशक्त राष्ट्रीय कला चळवळ म्हणून उभा राहिला असून, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख सांस्कृतिक केंद्रांमध्ये उदयोन्मुख कलाकारांना कलासंग्राहक आणि रसिकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महोत्सवाने केले आहे.
याविषयी बोलताना इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे संस्थापक राजेंद्र पाटील म्हणाले,
“इंडिया आर्ट फेस्टिव्हल ही संकल्पना आम्ही एक सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून यशस्वीपणे राबवली आहे. कलाकारांना थेट प्रेक्षकांशी संवाद साधता आला असून त्यांच्या कलाकृती थेट चित्रखरेदीदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. हा आमचा दुहेरी हेतू या माध्यमातून प्रत्यक्षात साकार झाला आहे.”
मुंबई २०२६ आवृत्तीत मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, उदयपूर, शांतिनिकेतन, गोवा, नागपूर आणि पुणे येथील कला दालनांसह सिंगापूर, दुबई आणि झ्युरिख (स्वित्झर्लंड) येथील आंतरराष्ट्रीय कला दालनांचा सहभाग पाहायला मिळाला.
आर्टिस्ट्स पॅव्हिलियनमध्ये स्वतंत्र कलाकारांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. यामध्ये ओम थाडकर, अंजली प्रभाकर, राजीव राय, कविता सचदेव, प्रविणा पारेपल्ली, धनश्री वझलवार, अशोक राठोड, कांचन महंते, शुभांगी जांगडे, एम. नारायण, शोभिता हरिहरन, अनिल वर्गीस, अरुल मुरुगन, रिया दास, सीमा गुप्ता, महेश सौंदत्ते, रुता इनामदार, युवराज पाटील, दीपा नाथ, पियाली सरकार, देव मेहता, राहत काझमी, विनीत कुमार, अॅना कुरियन, रुपाली मन्सिंगका, लक्ष्मी सुकुमारन, अंजुम शाह, चांदनी गुलाटी अग्रवाल, उमा कृष्णमूर्ती आदींसह शेकडो कलाकार सहभागी झाले होते.
गॅलरी सादरीकरणांमध्ये आधुनिक कलेतील दिग्गज आणि समकालीन कलाकारांची प्रभावी सांगड पाहायला मिळाली. यामध्ये एम. एफ. हुसेन, कृष्णेन खन्ना, जोगेन चौधरी, अकबर पदमसी, अंजोली एला मेनन, परेश मैती, मनु पारेख, अतुल दोडिया, टी. वैकुंठम, लालू प्रसाद शॉ, माधवी पारेख, लक्ष्मा गौड, जतिन दास आदींच्या कलाकृतींचा समावेश होता. त्यामुळे संग्राहकांना नामवंत तसेच उदयोन्मुख कलाकारांच्या कलाकृती एकाच व्यासपीठावर पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली.
२०२६ मध्ये मुंबईत यशस्वी पुनरागमन करत, इंडिया आर्ट फेस्टिव्हलने भारताच्या विकसित होत असलेल्या कला परिसंस्थेत आपली प्रेरणादायी भूमिका अधोरेखित केली. सर्वसमावेशकता आणि सर्जनशील देवाणघेवाणीची परंपरा पुढे नेत, हा महोत्सव भारतीय समकालीन कलेचा एक महत्त्वपूर्ण उत्सव म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाला.
Media Queries – Amod 8898870021 Vanshika 9324071021 ashwinipublicity@gmail.com

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

0 Comments