मराठा सेवा संघाच्या जडणघडणीत सोलापूरचे योगदान
शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला होता. पण जेधे, जवळकर, प्रबोधनकारानंतर तो थंडावला होता. या चळवळीला एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम २१ व्या शतकात युगपुरुष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली. सरकारी अधिकारी असतानाही साचेबद्ध जीवन जगण्याचं सोडून समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम केले. मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३३ कक्षांच्या माध्यमातून वाड्यावस्त्यांपासून ते विदेशात विचाराचे खंदे कार्यकर्ते निर्माण केले. यात सामान्य कामगारापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मराठा कुणबी समाजातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संघटना असावी या उद्देशाने अकोला येथे ०१ सप्टेंबर १९९० रोजी "मराठा सेवा संघ" या संघटनेची स्थापना झाली. शासकीय निमशासकीय पदावर कार्यरत असताना आपल्या पदाचा समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देता यावा या उद्देशाने स्थापन झालेल्या या संघटनेच्या विस्तारासाठी इंजी. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सोलापूर मध्ये "मराठा मंदिर मुंबई" या संस्थेच्या वसतीगृहात सध्या येथे समाजभूषण बाबासाहेब गावडे मंगल कार्यालय आहे. येथे बैठक आयोजित केली आणि मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी कार्यकारी अभियंता शिवाजीराव नारायणराव पाटील यांच्यावर सोपविली. अल्पावधीतच मराठा अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा आणि तालुकास्तरावरील नवीन कार्यकारणी अस्तित्वात आली.
सन १९९० ते २०२५ या पस्तीस वर्षात खेडेकर साहेबांनी सोलापूरवर फार प्रेम केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक कार्यक्रम झाले. हजारो कार्यकर्ते पदाधिकारी तयार झाले याचा मागोवा घेऊया.-
मराठा सेवा संघाचा आज जगभर वापरात असलेला लोगो (बोधचिन्ह) सोलापूरचे आपले पदाधिकारी जिल्हा कोषाध्यक्ष सा.बां. उप कार्यकारी अधिकारी मधुकर नारायण भोसले यांनी तयार केले आहे. एखाद्या संघटनेचा बोधचिन्ह हा त्या संघटनेच्या उद्देशाचा आत्मा असतो.
तरुणांनी बुट पॉलिश पासून तेल मालीश पर्यंतचे काम केले पाहिजे स्वतःच्या हिमतीवर उभे राहून कुटुंब जोपासले पाहिजेत ही शिकवण दिली. समाजातील आहे रे वाल्यांकडील पैसे नाही रे वाल्यांना देऊन त्यांना उभा करण्यासाठी मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था असावी अशी संकल्पना खेडेकर साहेबांनी मांडली. राज्यातील सेवा संघाची पहिली पतसंस्था तत्कालीन जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी मा.आर.जी. पाटील, मा.पा.नी. पवार, मा.रामराव ढोंगे-पाटील यांच्या सहकार्याने उभी केली. आज स्वतःच्या मालकीच्या जागेत ही पतसंस्था संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष नगरसेवक अमोल (बापू) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. हजारो तरुणांना उद्योग व्यवसाय उभा करण्यास मदत मिळाली.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूर येथे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तर संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन कुर्डुवाडी येथे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुनील मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले समाज मंथन होऊन यातून नव्या दमाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निर्माण झाले.
शिवधर्माची संकल्पना जाहीर झाल्यानंतर शिवधर्म जागर परिषदा विविध भागात झाल्या. सोलापूर शहरात महिलांची पहिली शिवधर्म परिषद झाली. विशेष म्हणजे नागपंचमी सणाच्या दिवशी झालेल्या या परिषदेला सभागृह भरगच्च भरून सभागृहा बाहेर बसण्याची व्यवस्था करावी लागली. शिवधर्म विश्व समन्वयक नेताजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमनताई खपाले, नंदाताई शिंदे, निर्मलाताई शेळवणे आदी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या अभुतपुर्व परिषद आयोजित केली.
डॉक्टर पंजाबराव शिक्षक परिषदेच्या स्थापनेनंतर शिक्षक परिषदेचे पहिले दोन दिवसीय अधिवेशन हुतात्मा स्मृती मंदिरात तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम गायकवाड आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्यात आली. समाजातील महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षकांची भूमिका मराठा सेवा संघाची चळवळ तळागळा पर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी घ्यावयाची जबाबदारी या विषयावर मंथन झाले. राज्यभरातील शिक्षणतज्ञ आणि शिक्षक उपस्थित होते. यातच राज्य कार्यकारिणी गठित करण्यात आली आणि शिक्षक परिषदेचा विस्तार झाला.
महाराष्ट्राला पोवाड्यातून महापुरुषांच्या विचारांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविणारे अनेक नामांकित शाहीर आहेत. यात खोट्या इतिहासाला बळी पडून चुकीची मांडणी होत आहे. म्हणून राज्यभरातील जवळपास १५० शाहिरांची पहिली शाहीर परिषद सोलापूरमध्ये दोन दिवस आयोजित करण्यात आली. यात शाहीर संभाजी भगत, राजेंद्र कांबळे, डॉ. राजीव चव्हाण यांच्यासह अनेकांनी प्रबोधनपर पोवाडे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राज्यभरातील शाहिरांनी आपल्या कलापथकाच भव्य मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी करुन उस्फुर्त प्रतिसाद दिला. शाहिर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम शहराध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या सह अन्य पदाधिकारी ही शाहिर परिषद यशस्वी केली.
मराठा सेवा संघाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नेताजीराव गोरे साहेबांनी "जिजाऊ संदेश" नावाने पाक्षिक सोलापूरातूनच चालू केले.
सोलापूर जिल्ह्यातून संघटनेचे ध्येय, धोरण, सर्वदूर पोहोचविणारे वक्ते श्रीमंत कोकाटे, पोवाड्यांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे शाहीर राजेंद्र कांबळे, मराठा मार्ग, जिजाऊ संदेश आणि अनेक नियतकालीकातून परखड मांडणी करणारे सर्जेराव भोसले, भरत यादव, मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कदम, प्रदेशाध्यक्ष शिरीष जाधव, प्रदेश कोष्याध्यक्ष अध्यक्ष रामराव ढोंगे-पाटील, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुनील बप्पा मोरे यांनी आपल्या कार्यकाळात आपापली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडली आणि संघटना एका उंचीवर घेऊन गेले.
मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी सकारत आहे. वर्षभर विविध बैठका कार्यक्रम येथे संपन्न होतात. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, पर्यटक येथे मुक्कामास असतात यांच्या सोयीसाठी उपयुक्त साहित्य भेट देणारे राज्यातील एकमेव टीम सोलापूरची आहे. आज पर्यंत २०० चादरी, १०० सतरंजी, १०० टॉवेल, ५०० खुर्च्या, ४०० चटई मॅट, ३०० गाद्या आदी लाखो रुपयांचे साहित्य राम गायकवाड, पोपट भोसले, प्रकाश शिंदे या कार्यकर्त्यांनी दिले आहे.
शिवधर्माचे प्रकटन झाल्यावर प्रत्येक शिवधर्मीयांच्या गळ्यात धातूची शिवमाला असावी अशी संकल्पना शिवधर्माचे विश्वसमन्वयक नेताजी गोरे साहेबांनी मांडली. हि 'शिवमाला' सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मधील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि सुवर्णकार रमेश महाडकर यांनी प्रत्यक्षात साकारली आज देश विदेशातील लाखो शिवधर्मीयांच्या गळ्यात ही शिवमाला दिसत आहे.
पंढरपूर येथे जिजाऊ महिला वसतीगृहाची इमारत उभी आहे. सुसज्ज खोल्या, सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या वसतीगृहात अनेक विद्यार्थीनींनी लाभ घेत आहेत.
मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षांपैकी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ही मुस्लिम मावळ्यांची संघटना मागील २० वर्षांपासून सोलापूरात उत्कृष्ट काम करत आहे. याचं फलित म्हणजे सोलापूरातील धार्मिक दंगली बंद झाल्या. सोलापूरात दर दहा वर्षांनी धार्मिक दंगली घडत होत्या यातून जीवित व वित्त हानी होत होती, पण मराठा सेवा संघ, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे या दंगली थांबल्या. शिवजयंतीमध्ये शेकडो मुस्लिम मावळे सहभागी होतात. राज्यातील एक आदर्शवत काम या मुस्लिम ब्रिगेडच चालू आहे.
मराठा सेवा संघ ही आज बहुजन समाजातील एक मोठा भावाची भूमिका घेऊन अठरा पगड बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जाणारी संघटना म्हणून नावारूपाला आली आहे याच पुर्ण श्रेय युगपुरुष ॲड पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना जात.
-राम गायकवाड
मराठी सेवा संघ सोलापूर
9370411422
0 Comments