अलिबाग पंचायत समितीत ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
प्रशासक तथा गट विकास अधिकारी शर्मिला पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
अलिबाग (मोहन जाधव) :- अलिबाग तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या मैदानावर ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७.४५ वाजता अलिबागच्या कन्या तथा प्रशासक आणि गट विकास अधिकारी शर्मिला पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशप्रेमी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना संचारली होती.
याप्रसंगी गट विकास अधिकारी शर्मिला पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव ठेवून सर्वांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण विकास, प्रशासनातील पारदर्शकता व लोकसेवेची भावना अधिक बळकट करण्यावर भर दिला.
या ध्वजारोहण सोहळ्यास पंचायत समिती अलिबागचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप ठाकूर यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने पंचायत समिती परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

0 Comments