अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपने आपला झेंडा रोवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदी रश्मी सागर हिप्परगी तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी तथा निवडणूक पिठासीन अधिकारी सुमित शिंदे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शंकर कवितके यांनी केली. निवडीची घोषणा होताच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीची घोषणा होताच सदस्य व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
नवनिर्वाचित सभापती रश्मी हिप्परगी यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षण, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांमध्ये ठोस कामे करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासाभिमुख प्रशासन राबविण्याची भूमिका स्पष्ट केली. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, योगीनाथ बाजारमठ, सुरेश नागोर, तुकप्पा नागोर, नगरसेवक महेश हिंडोळे, महेश इंगळे, अविनाश मडीखांबे, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, फैज अहमद कोरबु, लखन झंपले, मल्लिकार्जुन काटगाव तसेच भाजपचे पं.स. सदस्य सागर कल्याणशेट्टी, रश्मी हिप्परगी, अशा इंगळे, वैष्णवी सलगरे, विमल गव्हाणे, उत्तम वाघमारे, आप्पासाहेब किवडे, विनोद मोरे तर शिंदे सेनेचे सदस्य शीतल म्हेत्रे, भीमणा सोलापूरे, गणेश मोरे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी १० वाजता उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करून घेतल्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. दुपारी २ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला.
अक्कलकोट पंचायत समितीत भाजपचे १२ पैकी ८ सदस्य विजयी झाल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. विरोधी पक्ष शिंदे सेनेला चार जागा मिळाल्या आहेत.
चौकट :
• पंचायत समितीवर भाजपची सत्ता प्रस्थापित
• सभापती व उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध
• ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याची घोषणा
• कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

No comments:
Post a Comment