बार्शी पं.स.मध्ये रोंगे सभापती, निंबाळकर उपसभापती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

बार्शी पं.स.मध्ये रोंगे सभापती, निंबाळकर उपसभापती

बार्शी पं.स.मध्ये रोंगे सभापती, निंबाळकर उपसभापती


बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत सभापतीपदी उपळाई ठोंगे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या खडकलगाव येथील मीनाक्षी रोंगे यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी वैराग येथील संतोष निंबाळकर यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बार्शी तालुक्यात सलग २५ वर्षे पंचायत समितीत सत्ता असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव तालुका असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा राजकीय इतिहास घडल्याचे नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत भाजपच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे सांगितले. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आठवणी सांगताना त्यांनी माजी आमदार स्व. चंद्रकांत निंबाळकर, स्व. अण्णासाहेब बारबोले, माजी आमदार प्रभाताई झाडबुके आणि माजी आमदार किसनराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवासाला दिशा मिळाल्याची आठवण करून दिली.
पूर्वीच्या आणि आजच्या राजकारणात मोठा फरक पडल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिला. “यश मिळाल्याने हुरळून जाऊ नका आणि पराभवामुळे खचून जाऊ नका,” असा सल्ला देत राजकारण हे समाजसेवेचे साधन म्हणून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांना दिलेले शब्द पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत काम होणार नसेल तर खोटे आश्वासन देऊ नये, अन्यथा नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होऊन पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विकास निधीचे वाटप करताना तालुक्यातील सर्व पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये समानतेने निधीचे वितरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, कविता राऊत, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, बाबा गायकवाड, प्रमोद वाघमोडे, बबन गडदे, महावीर कदम, मदन दराडे यांच्यासह सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages