करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा पंचायत समितीत १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीची सत्ता स्थापन झाली असून सभापतिपदी भाजपच्या पूजा ढेरे तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अॅड. आजिनाथ विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे करमाळा पंचायत समितीत पहिल्यांदाच भाजपचा प्रभाव दिसून आला आहे.
करमाळा पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी आरक्षित आहे. सभापतिपदी विराजमान झालेल्या पूजा ढेरे या वीट गणातून विजयी झालेल्या उमेदवार आहेत. तर उपसभापती अॅड. आजिनाथ विघ्ने हे केतूर गणातून विजयी झाले आहेत. या निवडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडल्या. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम व तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या.
पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल आणि युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखालील भाजप व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांची युती झाली होती. या युतीने आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुका विकास आघाडीला आव्हान दिले होते. तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही भाजप-राष्ट्रवादी युतीला पाठिंबा दिला होता. निवडणुकीत १२ पैकी ८ जागा मिळवत युतीने बहुमत मिळवले.
सभापती आणि उपसभापती निवडीवेळी भाजप-राष्ट्रवादी युतीकडून सभापतिपदासाठी पूजा ढेरे तर उपसभापतिपदासाठी अॅड. आजिनाथ विघ्ने यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. तर करमाळा तालुका विकास आघाडीकडून सभापतिपदासाठी अदिती पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ढेरे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी विघ्ने यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंचायत समिती महत्त्वाची भूमिका बजावते. सत्ता काळात भाजप-राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी व सदस्य नागरिकांच्या अडचणी सोडवून विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतील, अशी प्रतिक्रिया युतीचे नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment