सांगोला पंचायत समितीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

सांगोला पंचायत समितीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता

 सांगोला पंचायत समितीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली असून सभापतिपदी भाजपच्या पूनम सुदर्शन इंगवले तर उपसभापतिपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी यांनी जाहीर केले.

सभापतिपदासाठी भाजप-शिवसेना युतीतर्फे पूनम इंगवले तर शेकापतर्फे काजल काशीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपसभापतिपदासाठी भाजप-सेना युतीकडून अजय सरगर तर शेकापकडून छाया कोळेकर यांनी अर्ज दाखल केला होता. दुपारी तीन वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये पूनम इंगवले यांना ८ मते तर काजल काशीद यांना ६ मते मिळाली. तसेच उपसभापती पदासाठी अजय सरगर यांना ८ तर छाया कोळेकर यांना ६ मते मिळाली. त्यामुळे इंगवले व सरगर हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सांगोला पंचायत समितीत एकूण १४ सदस्य आहेत. निवडणुकीत शेकाप व दीपक साळुंखे-पाटील गटाच्या विकास आघाडीचे ९ सदस्य विजयी झाले होते. त्यामध्ये शेकापचे ६ तर साळुंखे-पाटील गटाचे ३ सदस्य होते. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील गटाचे ४ सदस्य तर भाजपचा केवळ १ सदस्य निवडून आला होता. मात्र निवडीच्या आदल्या दिवशी ११ मार्च रोजी साळुंखे-पाटील गटाच्या तीन सदस्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे सदस्यसंख्या ४ झाली. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीकडे ८ सदस्य तर शेकापकडे ६ सदस्य राहिले आणि निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले.

निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे १९६७ ते २०२६ या जवळपास ५९ वर्षांच्या कालावधीत (प्रशासकीय कालावधी वगळता) पंचायत समितीवर शेकापचे वर्चस्व होते. पूनम इंगवले यांच्या सभापतिपदी निवडीमुळे हे दीर्घकाळ टिकलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे.

माजी आमदार शहाजी पाटील, दीपक साळुंखे-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मदतीने हा बदल घडवून आणला. विशेष म्हणजे १९६२ पासून २०२६ पर्यंत सांगोला तालुक्यातून पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नव्हता. २०२६ मध्ये भाजपचा एक सदस्य निवडून आल्यानंतर त्याच्या मदतीने प्रथमच पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यात यश आले. दिवंगत शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर अवघ्या चार वर्षांत हा मोठा राजकीय बदल झाल्याने तालुक्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages