सर्वधर्मीय अविवाहित तरुण-तरुणींसाठी वधू-वर सूचक मेळावा २४ जून रोजी
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- अभिनव सामाजिक संस्था, सोलापूर यांच्या वतीने सर्वधर्मीय अविवाहित तरुण व तरुणींसाठी वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन बुधवार, दि. २४ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत समाज कल्याण केंद्र हॉल, जिल्हा परिषद समोर, रंगभवन परिसर येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन समाजातील ज्येष्ठ समाजसेवक तसेच विवाह जुळवणी क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत योग्य जीवनसाथी शोधणे हे पालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षित, व्यावसायिक, नोकरदार तसेच विविध क्षेत्रांतील विवाह इच्छुक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांना एकत्र येऊन परस्पर विचारविनिमयाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सर्व जाती-धर्मांतील विवाह इच्छुक तरुण-तरुणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच आपल्या पाल्याची नोंदणी करू इच्छिणाऱ्या पालकांनी दि. २३ जूनपूर्वी नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनल रविकिरण दास यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे विवाह इच्छुक युवक-युवतींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य स्थळ शोधण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment