माढा न्यायालयाच्या शिक्षेला बार्शी सत्र न्यायालयाचा ब्रेक
१४ वर्षांनंतर न्याय; आरोपी निर्दोष मुक्त
बार्शी (कटूसत्य वृत्त):- उपळवटे (ता. माढा) येथे 2013 मध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात माढा न्यायालयाने सुनावलेली शिक्षा बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द करत आरोपी भैरू डांगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 14 वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना आरोपीने व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उपळवटे येथे सख्या चुलत भावाच्या शेतात आरोपीची जनावरे गेल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात **गुन्हा क्रमांक 173/2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर माढा येथील जेएमएफसी न्यायालयाने खटला चालवून 2019 मध्ये आरोपी भैरू डांगे यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाविरोधात आरोपीने अॅड. गणेश हांडे यांच्या माध्यमातून बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले. अपीलच्या सुनावणीदरम्यान अॅड. हांडे यांनी तपासातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
यामध्ये जखमीला मारहाण करण्यासाठी वापरल्याचा दावा असलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले नसल्याचा मुद्दा, जखमीचा एक्स-रे अहवाल न्यायालयीन नोंदीवर नसणे, एफआयआरमध्ये नमूद केलेल्या वादाच्या कारणाचा तपास न होणे, साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती, तसेच घटनास्थळाचा पंचनामा सिद्ध न होणे यांसारखे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले.
तसेच सर्वोच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा आधार घेत आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवादही करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने माढा न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपी भैरू डांगे यांची निर्दोष मुक्तता केली.
निर्णयानंतर आरोपीने न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत, "14 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर न्याय मिळाला," अशी प्रतिक्रिया दिली.
.png)
No comments:
Post a Comment