खेडेकरांनी मराठा समाजासाठी केला 'प्रबोधनाचा महाजागर'
'मोडेन पण वाकणार नाही ' चा व्यर्थ अभिमान बाळगत आपल्याच वस्तीत आणि उतरत चाललेल्या मस्तीत जगणारा समाज म्हणजे मराठा समाज. राजकारण वगळता इतर कोणत्याच क्षेत्रात प्रभाव नसणारा समाज म्हणजे मराठा समाज. मराठा महासंघाचं तुरळक संघटन वगळता व्यापक हित आणि दृष्टिकोन असणारं ना संघटन ना भयावह भविष्याचा वेध घेणारी दृष्टी. पेशवाईने मराठाशाही गिळंकृत केल्यापासून बौद्धिक दारिद्रय आणि आर्थिक दिवाळखोरीत जगणारा हा समाज. सन १९९० पर्यंत तरी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा दरारा आणि तुकड्या तुकडयात विभागणारा सातबारा एवढंच काय ते मराठयांचं भांडवल. अशा परिस्थितीत युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मोठ्या हिंमतीने आणि धाडसाने शासकीय नोकरीत असलेल्या निवडक अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र करून मराठा सेवा संघाची स्थापना केली. तेव्हापासून सोलापुर जिल्ह्यातही हे संघटन हळूहळू जोर धरू लागलं होतं परंतु जिल्हा परिषदेचे अभियंता म्हणून नावलौकिक मिळवलेल्या स्व. बाळासाहेब कदम यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य वापरून संपुर्ण जिल्हा पिंजून काढत जिल्हाभर प्रभावी संघटन उभं केलं. सर्वत्र प्रबोधन मेळावे,कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आणि व्याख्यानमाला सुरु झाल्या. कुर्डुवाडी येथील १९ फेब्रुवारी ( छत्रपती शिवाजी महाराज जयंती ) ते २४ फेबुवारी ( छत्रपती राजाराम महाराज जयंती ) असा सहा दिवसांचा 'छत्रपती जन्मोत्सव' आणि 'प्रबोधनाचा महाजागर' ही व्याख्यानमाला राज्यात अनेक ठिकाणी सुरु झाली.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यसंकलक शहाजी राजे, स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांचा इतिहास हेतुपुरस्सर दडवला होता, एवढेच नाही तर त्यांची एखादी चांगली प्रतिमाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे अशा अनेक महापुरुषांच्या प्रतिमा, पुतळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या पुढाकारातून तयार झाले. त्यापैकी शहाजी राजे आणि ग्रंथलेखन करणारे छत्रपती शंभूराजे यांची देखणी आकर्षक, सुबक आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी प्रतिमा इंजि.नेताजी गोरे यांच्या पुढाकारातून माढा तालुक्यातील बालाजी चोपडे आणि दिनेश कदम या सामान्य चित्रकारांकडून असामान्य प्रतिमा साकारली .पुढे त्यात सुयोग्य बदल होत गेले. छत्रपती शंभूराजांचा उभा असलेला भव्यदिव्य पुतळा सर्वप्रथम सोलापुरच्या मातीत सुप्रसिद्ध मूर्तीकार नितीन जाधव यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमातून तयार झाला.. तोच पुतळा पुढे महाराष्ट्रभर अधिवेशन, जिजाऊ जन्मोत्सव आणि रथयात्रेच्या माध्यमातून कौतुकाचा विषय ठरलेला होता .
मराठा समाज कायम धर्मसत्तेचा गुलाम रहिलेला समाज आहे. छत्रपती शिवरायांनी या गुलामीच्या बेड्या खिळखिळ्या केल्या आणि पुढे शंभूराजांनी त्या कडाकड तोडून टाकल्या आणि अवघ्या मराठी मुलुखात स्वातंत्रय, समता आणि बंधुता प्रस्थापित केली. शस्त्र चालवण्यात तर आम्ही पारंगत आहोतच पण शास्त्रात सुद्धा आम्ही निपुण आहोत, हे दाखवून देत परकियांची मुजोरी आणि स्वकियांची मग्रुरी मोडून काढली. पण पुढे पेशवाईच्या काळ्याकुट्ट राजवटीत ही परंपरा पुढच्या पिढीला संक्रमित करता आली नाही. कोल्हापुरच्या संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी ती पुनर्जीवीत केली. पण हिंदुत्वाच्या ढोंगबाजीने त्यावरही मात केली. मराठा सेवा संघाने बिकट परिस्थितीत मराठ्याच्या मानगुटीवरचं हे जोखड झुगारून देण्यासाठी आपले मूळ पुरुष शिव (शंकर, महादेव) आणि पार्वती शी आपली सांस्कृतिक नाळ जोडून त्याची शृंखला थेट आताच्या मराठ्यांपर्यंत आणली. त्यामुळे आपल्या मूळ संस्कृतीवरची ब्राम्हण त्वाची पुटं गळून पडली आणि शिवधर्माच्या माध्यमातून ती लखलखीत झाली.यात डॉ.आ.ह.साळुंखे, प्रा. डॉ. अशोक राणा, पुरुषोत्तम खेडेकर.. याच्यासारख्या अनेकांचं योगदान शब्दबद्ध करता येणार नाही, एवढं ते व्यापक आहे. त्यातून आपला वैभवशाली इतिहास, हेवा वाटावा अशी प्राचीन पण प्रगत संस्कृती, नामदेव तुकोबाचं संत वाडःमय उजळविण्यासाठी हजारो लेखक, वक्ते तयार झाले, प्रकाशनसंस्था उभा राहिल्या, वितरक तयार झाले १२ जानेवारीला एका दिवसात कोट्यावधी रुपयांची पुस्तके विकण्याचा विक्रम करणं ही केवळ काल्पनिक गोष्ट प्रबोधनामुळे सत्यात उतरली .. पत्रकारिता, उद्योग -व्यवसाय, विज्ञान - तंत्रज्ञान, राजकारण, समाजकारण यासारख्या सर्वच क्षेत्रात राज्यभर हजारो तरुण मुले मुली मोठ्या आत्मविश्वासाने वावरत आहेत, हे केवळ आणि केवळ मराठा सेवा संघ आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्यामुळेच शक्य झाले आहे. मराठा सेवा संघाच्या मूळ विचारधारेतुन तयार झालेली मुलं -मुली किंवा संभाजी बिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सर्वच कक्षांच्या माध्यमातून पुढे आलेली मुलं आज प्रत्यक्ष संघटनेत असो किंवा नसो पण ती मोठ्या आत्मविश्वासाने ते आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. आज या विचारानेच 'आमच्या धडावर आमचंच मस्तक ' तयार झालंय. म्हणून आणि म्हणूनच आमचं मन,मनगट, मस्तक, मान आणि मेंदू सशक्त करून इतिहासाची जाण आणि वर्तमानाचं भान ठेवत भविष्याच्या अचूक अंदाज घेत मार्गक्रमण करण्याचं बळ आमच्या पंखात निर्माण करणाऱ्या आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांना अमृत महोत्सवानिमित्त उत्तम दीर्घायुष्य लाभो हीच आई जिजाऊ आणि तुळताईच्या चरणी प्रार्थना...
-सर्जेराव भोसले कुर्डूवाडी
0 Comments