खंडित वीजपुरवठ्यामुळे बार्शीतील उद्योग अडचणीत; उद्योजकांचा महावितरण कार्यालयावर संताप
बार्शी (कटूसत्य वृत्त): एकीकडे बार्शी एमआयडीसी परिसरात नवीन उद्योग येऊन रोजगारनिर्मिती वाढावी यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन प्रयत्न करत असताना, दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या उद्योगांनाच खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी गाताची वाडी परिसरातील प्लास्टिक उद्योग चालकांनी शुक्रवारी आपल्या कामगारांसह थेट महावितरण कार्यालय गाठत तीव्र नाराजी व्यक्त केली.
उद्योग चालकांनी आरोप केला की, गेल्या सहा महिन्यांपासून परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम होत आहे. उत्पादन सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मशीनरी बंद पडते, उत्पादन प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होतो तसेच कच्च्या मालाचेही नुकसान सहन करावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
यावेळी महिला कामगारांनीही आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेकदा काम बंद ठेवावे लागते. काही वेळा संपूर्ण दिवसाचे कामकाज विस्कळीत होते, तर काम उपलब्ध नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कामगारांच्या दैनंदिन उत्पन्नावर तसेच कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावरही परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
उद्योजकांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही वीजपुरवठ्यात कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता उद्योजकांचा संयम सुटत असल्याचे चित्र आहे.
यावेळी कामगार प्रतिनिधी राज ढोले आणि गजानन पवार यांनी समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. उद्योजकांनी कार्यकारी अभियंता राकेश मगर यांना निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच "उद्योग टिकले तरच रोजगार टिकतील. अशा परिस्थितीत मूलभूत सुविधा सुरळीत असणे आवश्यक आहे," असे सांगत यापुढे लोकप्रतिनिधींसमोरही हा प्रश्न मांडणार असल्याचा इशारा उद्योजकांनी दिला.
आता महावितरण प्रशासन या समस्येकडे किती गांभीर्याने पाहते आणि किती तत्परतेने उपाययोजना करते, याकडे उद्योग क्षेत्र आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment