नियमांचे पालन करून सण साजरा करा; कायदा हातात घेऊ नका – पोलीस आयुक्त एम. राज कुमार
सोलापूर (कटूसत्य वृत्त): उत्सव आणि धार्मिक सण साजरे करताना अनेकदा कायदेशीर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा आणि नियमांचे पालन करून शांततेत सण साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, महानगरपालिकेचे अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, प्रमुख मशिदींचे विश्वस्त तसेच शहरातील ईदगाह मैदानांचे विश्वस्त उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह संदेश, फोटो किंवा व्हिडिओ पुढे पाठवू नयेत, अफवांना बळी पडू नये आणि जातीय ऐक्य अबाधित राखावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि नागरिक प्रतिनिधींनी बकरी ईदच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि सूचना प्रशासनासमोर मांडल्या. त्यावर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.
बैठकीची प्रस्तावना करताना पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी सांगितले की, बकरी ईदच्या काळात गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. अशी वाहतूक निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिस किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. मात्र कोणतीही खाजगी व्यक्ती किंवा संघटनांचे कार्यकर्ते स्वतः वाहन अडविण्यासारखा कायदा हातात घेण्याचा प्रकार करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी रक्त किंवा मांस उघड्यावर पडणार नाही, स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि दुर्गंधी किंवा रोगराई पसरू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य, पोलीस उपायुक्त वसीम बुन्हाण, प्रितम पावलकर, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, दिलीप पवार, सुधीर खिरडकर, राजन माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका आकुलवार, तपन डंके, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अग्निशमन विभागाचे अधिकारी समीर पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आणि विविध समाजप्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment