सर्व्हरच्या 'खो'मुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा; विद्यार्थी-पालकांचा संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 23, 2026

सर्व्हरच्या 'खो'मुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा; विद्यार्थी-पालकांचा संताप

सर्व्हरच्या 'खो'मुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा; विद्यार्थी पालकांचा संताप

सोलापूर (कटूसत्य वृत्त): दहावीचा निकाल यंदा लवकर जाहीर झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि वेगाने पार पडेल, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली होती. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दिवसभर 'अंडर मेंटेनन्स'चा संदेश झळकत राहिल्याने हजारो विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अकरावी प्रवेशासाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, ‘भाग-१’ फॉर्ममधील बदल तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र, महाविद्यालय निवडीच्या टप्प्यावर वेबसाइट अचानक संथ झाली आणि काही वेळातच संपूर्ण प्रणाली ठप्प पडली. स्क्रीनवर 'अंडर मेंटेनन्स'चा संदेश दिसू लागल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दिवसभर सर्व्हर सुरळीत न झाल्याने अनेक पालकांनी संताप व्यक्त केला. घरच्या संगणकावर किंवा मोबाइलवर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अनेकांनी अखेर रात्री उशिरा महा-ई-सेवा केंद्रे आणि सायबर कॅफेकडे धाव घेतली. शहरातील अनेक केंद्रांवर मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सर्व्हरवरील ताण काहीसा कमी झाल्यानंतर अनेक पालकांनी रात्री उशिरापर्यंत जागून मुलांचे फॉर्म भरून घेतले.
"दहावीचा निकाल वेळेपूर्वी जाहीर करून शिक्षण विभागाने चांगले पाऊल उचलले, मात्र ऑनलाइन यंत्रणा सक्षम नसेल तर विद्यार्थ्यांची अशी फरफट कशासाठी?" असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दिवसभर प्रयत्न करूनही फॉर्म भरता आला नाही, शेवटी रात्री सायबर कॅफेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागली, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींची दखल घेत शिक्षण संचालकांनी महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाविद्यालय निवडीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, दहावीचा निकाल जाहीर होऊनही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नसल्याने अंतिम प्रवेश प्रक्रियेत आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच डिजिटल प्रणालीवर अवलंबून असलेल्या प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अपयश पुन्हा एकदा समोर आले असून, गेल्या वर्षीची परिस्थिती यंदाही कायम राहिल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages