दत्तकला शिक्षण संस्था–अनअकॅडमीमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे नवे दालन खुले
करमाळा (कटूसत्य वृत्त): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरांप्रमाणे उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी गावातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने दत्तकला शिक्षण संस्था आणि Unacademy यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अक्षय बोरकर, चंद्रकांत सोमवंशी यांच्यासह दत्तकला शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, प्राचार्या सिंधू यादव, वृषाली बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. हा करार ११ मेपासून अधिकृतपणे लागू झाला असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध इंटिग्रेटेड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबई, कोटा यांसारख्या मोठ्या शहरांकडे जावे लागते. मात्र आर्थिक अडचणी, निवास व्यवस्था, प्रवास खर्च आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी मागे पडतात. ही बाब लक्षात घेऊन संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
या करारामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित शालेय शिक्षणासोबतच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती, विश्लेषण क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाणार असून शालेय वेळेतच गणित, विज्ञान आणि त्या आधारित विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत संकल्पना मजबूत होऊन स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी लहान वयातच सुरू होणार आहे.
तसेच इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भविष्यात करिअर काउन्सिलिंग, पालक मार्गदर्शन कार्यशाळा, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा सेमिनार आणि शिष्यवृत्ती योजना राबविण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत आधुनिक स्पर्धात्मक शिक्षणाची नवी दिशा देणारा हा करार ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
No comments:
Post a Comment