'जकराया'च्या थकीत ऊस बिलासाठी बेमुदत आंदोलन; शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह देण्याची मागणी
पोखरापूर (कटूसत्य वृत्त): मोहोळ तालुक्यातील वटवट येथील जकराया शुगर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या चालू गळीत हंगामातील ऊस दराची संपूर्ण रक्कम अद्याप शेतकऱ्यांना न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जकराया साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या दरापैकी केवळ ५० टक्के रक्कम अदा केली आहे. कारखान्याने प्रतिटन १५०० रुपयांप्रमाणे काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असली, तरी उर्वरित ५० टक्के थकीत रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही.
शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रतिटन ३ हजार रुपये तसेच थकीत रकमेवर १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक आहे. मात्र कारखाना प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
याबाबत प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित कारखान्यावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्वरित मिळवून द्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रभाकर देशमुख यांनी दिला.
या आंदोलनात बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार, अभिमान गायकवाड, संभाजी माळी, सिद्राम वाघमोडे, नागेश बारबोले, शुभम तळेकर, पृथ्वीराज भोसले, उमेश माने, अनिल वसेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment