“पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सर्व कामे पूर्ण करा; नागरिकांना त्रास होऊ देणार नाही”-महापौर कोंड्याल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत तसेच नाल्यांमधील पाण्याचा सुरळीत प्रवाह कायम राहावा यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव, नगर अभियंता सारिका अक्कूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि त्या त्या प्रभागातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात जुना पूना नाका येथील नाला, बाळे परिसरातील वैष्णवी हाइट्स, उमानगर येथील शरदचंद्र पवार शाळेजवळील नाला, स्पर्श हॉस्पिटल परिसर, गुलमोहर अपार्टमेंट, ६ कमान, १४ कमान, यश नगर तसेच ५४ मीटर रस्ता परिसरातील नाल्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
यावेळी नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा प्रवाह, अतिक्रमणे, गाळ साचलेली ठिकाणे तसेच पाण्याचा निचरा सुरळीत होत आहे का याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी अनेक ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाल्यामध्ये मिश्रित होणारे सांडपाणी अथवा अन्य पाण्याचे स्रोत याबाबत सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले.
पाहणीदरम्यान काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे छोटे पूल आणि इतर अडथळे आढळून आले. त्याबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक कार्यवाही करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता, दुरुस्ती तसेच खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल म्हणाले, “पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, शहरात पाणी साचू नये आणि नाल्यांमधील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची नियमित स्वच्छता, पाहणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. ज्या ठिकाणी अडथळे किंवा समस्या आढळतील त्या तत्काळ सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”
या पाहणी मोहिमेमुळे शहरातील नाला स्वच्छता आणि पावसाळी पूर्वतयारीच्या कामांना अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment