कुरनूर धरणावरील बिघाड १२ तासांत दूर; अक्कलकोटचा पाणीपुरवठा पूर्ववत
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :-शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण करणारा कुरनूर धरणावरील १२० एचपी क्षमतेच्या मोटार पंपातील तांत्रिक बिघाड नगरपरिषदेच्या तत्परतेमुळे अवघ्या १२ तासांत दूर करण्यात आला. त्यामुळे तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता टळली असून बुधवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.
अक्कलकोट शहराला कुरनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणावरील पंप हाऊसमधील मोटार पंपात बिघाड झाल्याने सोमवारी रात्रीपासूनच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व पाणीपुरवठा सभापती देविदास कवटगी यांनी कुरनूर धरणावर प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख मनोज ईश्वरकट्टी यांना तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आले. नगराध्यक्षांनीही कर्मचाऱ्यांशी चर्चा करून काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने सुरुवातीला दुरुस्तीसाठी सुमारे ७२ तास लागू शकतात, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वयामुळे हे काम अवघ्या १२ तासांत पूर्ण करण्यात यश आले.
दरम्यान, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी सांगवी जलाशयाचीही पाहणी केली. जलाशयात केवळ चार ते पाच दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील नियोजनाबाबत पाणीपुरवठा विभाग व प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली. शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या अक्कलकोट शहराला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात असून, या बिघाडामुळे पुरवठा उशिराने होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळेत दुरुस्ती पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment