“होय, आम्ही झुरळ!” म्हणत युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 22, 2026

“होय, आम्ही झुरळ!” म्हणत युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

 “होय, आम्ही झुरळ!” म्हणत युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशातील कोट्यवधी युवक-युवती आज शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी, खासगीकरण आणि असुरक्षित भविष्य अशा असंख्य संकटांशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून युवकांची तुलना “झुरळांशी” करण्यात येणे ही अत्यंत संतापजनक, अपमानास्पद आणि असंवेदनशील बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने व्यक्त केली आहे.

“हा केवळ शब्दांचा प्रश्न नाही; हा 
देशातील तरुण पिढीच्या स्वाभिमानावर केलेला घाव आहे,” असे युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी सांगितले. युवक म्हणजे देशाची ऊर्जा, श्रम, बुद्धिमत्ता आणि भविष्य असून, कारखान्यात राबणारा कामगार युवक, शेतात घाम गाळणारा शेतकरी युवक, स्पर्धा परीक्षांसाठी आयुष्य झिजवणारा विद्यार्थी आणि बेरोजगारीशी झुंज देणारा पदवीधर हे “झुरळ” नसून भारताच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज देशातील लाखो युवक रोजगारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी व्यवस्था युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगून आहे. अशा वेळी न्यायासनावरून येणारे अपमानकारक वक्तव्य युवकांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याची टीका करण्यात आली. संविधानिक पदांवरील व्यक्तींनी संयम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे; अन्यथा जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही युवा महासंघाने दिला.

युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण म्हणाले की, “देशातील युवक भीक मागत नाहीत, ते त्यांच्या हक्काची मागणी करत आहेत. आम्हाला ‘झुरळ’ समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावे — याच युवकांच्या श्रमावर देश उभा आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही याच युवकांमध्ये आहे.”

भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी तरुणांनी “होय, आम्ही झुरळ!” असे उपरोधिक विधान असलेली जॅकेट परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले. युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही देण्यात आली.

सदर निवेदन मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश यांना पाठविण्यात आले.

यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, राज्य समिती सदस्य विजय हरसुरे, अश्विनी मामाड्याल, तसेच नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages