मुदत संपली तरी ‘यूजर चार्जेस’ वसुली सुरूच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

मुदत संपली तरी ‘यूजर चार्जेस’ वसुली सुरूच

 मुदत संपली तरी ‘यूजर चार्जेस’ वसुली सुरूच




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेकडून शहरातील मिळकतदारांकडून विविध करांच्या वसुलीत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी केला आहे. सभागृहात मंजूर ठरावाला डावलून मुदत संपल्यानंतरही ‘यूजर चार्जेस’च्या नावाखाली दरवर्षी ६०० रुपयांची वसुली सुरूच ठेवण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.

शहरासह हद्दवाढ भागात भुयारी गटार योजना आणि ड्रेनेज लाईनच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांसाठी महापालिकेचा हिस्सा उभारण्यासाठी सन २०१० पासून प्रत्येक मिळकतदाराकडून मालमत्ता कराच्या बिलातून दरवर्षी ६०० रुपये वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही वसुली केवळ १० वर्षांसाठी म्हणजे सन २०२० पर्यंत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

मात्र संबंधित कालावधी संपूनही २०२५-२६ पर्यंत ही वसुली सुरू ठेवण्यात आली असून नव्या आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्येही ती कायम ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

याशिवाय सन २०१९ पासून घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ‘उपकर निधी’ या नावाने आणखी ६०० रुपयांची वसुली करण्यात येत आहे. शहरातील अनेक भागात नियमित घंटागाडी सेवा उपलब्ध नसतानाही हा कर वसूल केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दोन्ही कर स्वच्छतेशी संबंधित असताना एकाच मालमत्ता कर बिलातून वेगवेगळ्या नावाने वसुली का केली जाते, असा सवाल उपस्थित करत अंदाजपत्रकातील सुमारे २५ कोटी रुपयांच्या जमा बाजूत घोळ झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages